Join us

‘एनआरसी’च्या खासगी बाउन्सरचा हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : एमआआरडीएकडून मोहने परिसरात रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. यावेळी एनआरसी कंपनीच्या पाणीच्या पंपाला वीजपुरवठा करणारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : एमआआरडीएकडून मोहने परिसरात रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. यावेळी एनआरसी कंपनीच्या पाणीच्या पंपाला वीजपुरवठा करणारी केबल तुटली. या केबल दुरुस्तीच्या बिलापोटी पैसे द्या, अशी मागणी कंपनीचे अधिकारी करत होते. कंपनी आणि एमएमआरडीएचे अधिकारी यांच्यात वाद सुरू असताना कंपनीच्या खासगी बाऊन्सरने हवेत गोळीबार केल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, गोळीबार करणारा बाऊन्सर अनिलकुमार सिंग याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना पंपाला वीजपुरठा करणारी केबल तुटल्याने एनआरसी कंपनीचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. केबल दुरुस्तीचा खर्च भरून द्या, अशी मागणी कंपनीचे अधिकारी करत होते. कंपनीकडून जास्तीचा खर्च सांगितला जात असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे हा वाद मिटत नव्हता. हा वाद सुरू असताना कंपनीचे खासगी बाउन्सर तेथे पोहोचले. त्यापैकी सिंग याने हवेत गोळीबार केला. गोळी कोणाला लागली नाही. मात्र गोळीबार होताच सगळेच भीतीपोटी पांगले. पोलिसांनी सिंग याला अटक केली आहे.

दहशत माजवण्याचा प्रकार

एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी दिली गेली नसताना कंपनीच्या कामगार वसाहतीमधील घरे व बंगले पाडण्याचे काम सुरू आहे. त्याला कामगारांचा विरोध होत आहे. याप्रकरणी २५ कामगारांना पोलिसांनी चार दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुन्हा केबल दुरुस्तीवरून अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू असताना कंपनीच्या खासगी बाउन्सरने गोळीबार केल्याने एक प्रकारे दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कामगारांनी सांगितले.