मुंबई : क्रीडाविश्वातील प्रतिष्ठेच्या क्लबपैकी एक असलेल्या नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडियाच्या (एनएससीआय) खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमक दाखवून क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. नुकताच या सर्व खेळाडूंचे एनएससीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंतीलाल शाह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एनएससीआयच्या यंदाच्या वार्षिक निवडणुकीमध्ये ‘अॅक्शन टीम’ गटाने सर्वाधिक ६५% मते आपल्या पारड्यात पाडून पुन्हा एकदा वर्चस्व राखले. क्लबच्या मुंबई व दिल्ली या दोन्ही केंद्रांवर अॅक्शन टीमने बाजी मारली असून, दोन्ही केंद्रांतील विजयी उमेदवारांनी एनएससीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जयंतीलाल शाह यांची बिनविरोध निवड केली आहे. विशेष म्हणजे २०१२ सालापासून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकत असलेल्या शाह यांच्या कार्यकाळामध्ये मुंबई आणि दिल्ली केंद्रांत खेळाडूंसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या व त्या जोरावर खेळाडूंनी गौरवास्पद कामगिरी केली.गेल्या वर्षी म्हणजे २०१६मध्ये मुलींच्या राष्ट्रीय सुपर सिरिज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गौरी भागियाने बाजी मारत क्लबचे नाव उंचावले. त्याच वर्षी गौरीने १६ व १८ वर्षांखालील स्पर्धेचेही जेतेपद पटकावले. दुसरीकडे, एनएससीआयच्या श्रेयस मेहताने स्क्वॉशमध्ये जबरदस्त कामगिरी करत २०१६ साली यूएस स्क्वॉश १३ वर्षांखालील गटाचे विजेतेपद उंचावले. तसेच, नुकत्याच झालेल्या मुलांच्या स्कॉटिश ज्युनिअर स्क्वॉश स्पर्धेतही श्रेयसने बाजी मारत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. टेनिस व स्क्वॉशसह एनएससीआयने टेबल टेनिसमध्येही चमक दाखवली असून, महाराष्ट्राचा आघाडीचा खेळाडू आणि एनएससीआयचा स्टार म्हणून गणला जात असलेल्या मुदित दाणीने गेल्या वर्षी कतार ओपनमध्ये ज्युनिअर आणि कॅडेट गटात बाजी मारून डबल धमाका केला. या सर्व विजयी खेळाडूंना शाह यांच्या हस्ते गौरविण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)
एनएससीआयच्या खेळाडूंची चमक
By admin | Published: March 21, 2017 2:28 AM