तांत्रिक बिघाडामुळे एनएसई ठप्प; नियोजित वेळेनंतरही चालले शेअर बाजारांचे कामकाज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 01:20 AM2021-02-25T01:20:20+5:302021-02-25T01:20:27+5:30
नियोजित वेळेनंतरही चालले शेअर बाजारांचे कामकाज
मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये कनेक्टीव्हिटी नसल्यामुळे व्यवहार बंद पडले. यामुळे नियोजितवेळी व्यवहार संपल्यानंतर मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवहार चालविण्यात आले. बाजाराच्या नियोजित वेळेनंतर व्यवहार चालविण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी.
शेअर बाजाराचे व्यवहार सुरू असतानाच सकाळी ११.४० वाजता राष्ट्रीय शेअर बाजाराची कनेक्टिव्हिटी अचानक गेल्याने व्यवहार बंद पडले. बाजारात अचानक निर्माण झालेल्या या समस्येने गुंतवणूकदार हैराण झाले. बाजारात काय झाले, याबद्दल काहीच माहिती मिळत नसल्याने काहीशी घबराटही होती. नंतर राष्ट्रीय शेअर बाजाराने व्यत्यय येण्याचे कारण जाहीर केल्याने गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला.
मात्र यावेळी मुंबई शेअर बाजाराचे व्यवहार सुरळीत सुरू असल्यामुळे फारशी अडचण आली नाही. राष्ट्रीय शेअर बाजार दोन सेवा प्रदानकर्त्यांकडून इंटरनेटची सेवा घेत असतो. समजा एकाची सेवा बंद पडल्यास दुसऱ्या सेवेकडे बदल होतो. मात्र बुधवारी एकाच वेळी या दोन्ही सेवा प्रदानकर्त्यांची सेवा बंद पडल्याने व्यवहार ठप्प झाले.
बाजारातील व्यवहारांची नियोजित वेळ संपता संपता मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराने पाच वाजेपर्यंत शेअर्स तसेच डेरिव्हेटिव्हजचे व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाच वाजेपर्यंत बाजार सुरू होता. दरम्यान बाजाराचे नियामक असलेल्या सेबीने राष्ट्रीय शेअर बाजाराला याबाबत विचारणा केली आहे. बाजाराचे व्यवहार बंद पडल्यानंतर सर्व यंत्रणा आपत्कालीन सेवेकडे का बदलली गेली नाही, याचा खुलासा सेबीने मागविला आहे.