एनएसईएलच्या मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:33 AM2017-12-28T04:33:47+5:302017-12-28T04:34:26+5:30
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अॅक्ट अंतर्गत एनएसईएलच्या १७७.३३ कोटी रुपयांच्या दहा स्थावर मालमत्ता बुधवारी जप्त केल्या.
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अॅक्ट अंतर्गत एनएसईएलच्या १७७.३३ कोटी रुपयांच्या दहा स्थावर मालमत्ता बुधवारी जप्त केल्या. या मालमत्ता मेसर्स पी. डी. अॅग्रो प्रोसेसर प्रा. लि. आणि मेसर्स दुनार फूड्स लि. च्या नियंत्रणाखाली होत्या. या दोन्ही कंपन्यांनी एनएसईएलची मोठी रक्कम थकविली आहे.
आॅक्टोबर २०१३ मध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) गुन्हा नोंदविल्यानंतर ईडीनेही एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. गुंतवणूकदारांना फसविण्यासाठी आरोपींनी कट रचल्याचा आरोप ईडीने केला आहे. गोदामाच्या बनावट पावत्या, बनावट खाती बनवून, सुमारे १३,००० गुंतवणूकदारांना फसविण्यात आले. तब्बल ५,६०० कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे.
या ५,६०० कोटी रुपयांपैकी मेसर्स पी. डी. अॅग्रो प्रोसेसर्स प्रा. लि.ची ६३७ कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे. ईडीने आता २१५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून, या प्रकरणी ईडीने आत्तापर्यंत एकूण २,८९० कोटी रुपयांच्या मालमत्तेची जप्ती केली आहे. खरेदी व्यवहाराची खोटी माहिती देऊन मेसर्स पी. डी. अॅग्रो प्रोसेसर्सने एनएसईएलकडून मोठी रक्कम उचलली.
याबाबत मार्च २०१५ मध्ये तक्रार केली असून, सध्या हे प्रकरण विशेष पीएमएलए न्यायालयात प्रलंबित असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.