एनएसजी करणार आरे कारशेडची तपासणी; मेट्रोच्या प्रकल्पांची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 07:48 AM2022-12-06T07:48:49+5:302022-12-06T07:49:05+5:30
मुंबईच्या उपनगरात वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर मेट्रो धावत आहे. ही मेट्रो पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडत असून, या मेट्रोचा डेपो वर्सोवा येथे आहे.
मुंबई : ‘मुंबईला हादसो’ का शहर म्हटले जाते. या शहरात सतत काही ना काही घडत असते. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तर मुंबई सर्वात वरच्या क्रमांकावर; कारण काय तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. अशाच मायानगरीत भविष्यात धावणाऱ्या आणि धावत असलेल्या मेट्रोच्या डेपोची पाहणी आता राष्ट्रीय सुरक्षा दलाकडून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मेट्रो ३ च्या कारशेडवरून सतत वादंग निर्माण होत असतानाच राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या पाहणी यादीत आरे कारशेडदेखील असणार आहे.
मुंबईच्या उपनगरात वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर मेट्रो धावत आहे. ही मेट्रो पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडत असून, या मेट्रोचा डेपो वर्सोवा येथे आहे. पश्चिम उपनगरात दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व असा मेट्रो ७ मार्ग उभारण्यात आला आहे. मेट्रो ७ मार्गावर अर्ध्या टप्प्यात मेट्रो धावत असून, डिसेंबरच्या मध्यात किंवा उत्तरार्धात उर्वरित टप्प्यावर मेट्रो धावणार आहे. या मेट्रोचा डेपो चारकोप येथे आहे. तर देशातील पहिल्या वहिल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो - ३ चे काम देखील वेगाने सुरु असून, भुयारीकरणाचे काम १०० टक्के झाले आहे. या मेट्रोचे कारशेड आरेमध्ये होत आहे.
धोकादायक घटक तपासणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सुरक्षा दल मुंबईत येणार आहे. त्यांच्याकडून मेट्रोच्या डेपोची पाहणी केली जाईल. मेट्रो १, आणि मेट्रो ७ मेट्रो ३ सारख्या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांचा यात समावेश आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही धोकादायक घटक स्थानकांत, डेपो आहेत का?, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे का?, अशा सर्व गोष्टी तपासल्या जाणार आहेत.
आरे डेपोच्या जागेसह मुंबई मेट्रो स्थानकाच्या काही संवेदनशील ठिकाणी सर्वेक्षण होईल.
मेट्रोच्या विविध साईट्सना भेट दिली जाईल.
धोक्याचे आणि सुरक्षा उपायांचे मूल्यांकन केले जाईल.