सातिवली गावामध्ये एनएसएस कॅम्प
By admin | Published: October 13, 2015 02:23 AM2015-10-13T02:23:49+5:302015-10-13T02:23:49+5:30
सध्या प्रत्येक कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांना वेध लागलेत ते एनएसएस युनिटचा आत्मा असलेल्या ‘कॅम्प’चे. असाच एक कॅम्प नुकताच पालघर जिल्ह्यातील सातिवली गावामध्ये पार पडला.
मुंबई : सध्या प्रत्येक कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांना वेध लागलेत ते एनएसएस युनिटचा आत्मा असलेल्या ‘कॅम्प’चे. असाच एक कॅम्प नुकताच पालघर जिल्ह्यातील सातिवली गावामध्ये पार पडला. मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत सर्वप्रथम कॅम्प आयोजित होतो तो बोरीवलीच्या गोखले शिक्षण संस्थेच्या श्री भाऊसाहेब वर्तक कॉलेजचा आणि यंदासुध्दा या कॉलेजने आपली परंपरा कायम राखली. ५ ते ११ आॅक्टोबर दरम्यान सातिवली येथील श्री शंकर मंदिर ट्रस्ट या धार्मिक स्थळावर पार पडलेल्या या कॅम्पमध्ये ८४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. नितीन आचार्य, श्री शंकर मंदिर संस्थेचे विश्वस्थ कृष्णा देसले यांच्या उपस्थित उद्घाटन झालेल्या या कॅम्पमध्ये एनएसएस विद्यार्थ्यांनी पहिल्या तीन दिवसांत पावसात वाहून गेलेल्या रस्त्याचे उत्कृष्ट काम करुन येथील भाविकांची महत्त्वाची अडचण दूर केली. तसेच मंदिर परिसरातील साफसफाई करुन सातिवली देवस्थानचा सगळा परिसर स्वच्छ केला. त्याचप्रमाणे कॅम्पच्या चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांनी गावामध्ये सर्व्हे करुन स्थानिकांच्या राहणीमाना विषयी माहिती घेतली.
सातिवली देवस्थान गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिध्द आहे. येथील भूगर्भात मोठा प्रमाणात गंधकाचा साठा असल्याने तयार झालेल्या गरम पाण्याच्या नैसर्गिक कुंडात आंघोळ करण्यासाठी दररोज भाविकांची गर्दी असते. दिवसभर भाविकांनी कुंडात आंघोळ केल्यानंतर संध्याकाळी एनएसएस विद्यार्थ्यांनी तिन्ही कुंडांची स्वच्छता केली. प्रोग्राम आॅफिसर प्रा. प्रवीण गाडगे आणि पी. काजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सर्व कामे पार पाडली.
यावेळी मुंबई युनिव्हर्सिटीच्या एनएसएस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. मुंबई युनिव्हर्सिटीचे एनएसएस सहसमन्वयक डी. जी. फोंडेकर, विशाल सावंत (विभाग समन्वयक), आनंद राजावत (प्रोग्राम आॅफिसर, विवा कॉलेज), स्वाती देसाई (मुंबई उपनगर जिल्हा समन्वयक), केतन रावल (मुं.उपनगर विभाग समन्वयक) आणि डॉ. सतीश नारींगरेकर या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गर्शन केले. त्याचप्रमाणे कॉलेजच्या प्राचार्या डॉ. एस. व्ही संत आणि उपप्राचार्य आर. पी. देशपांडे यांनीही कॅम्पल भेट देऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या कामांची माहिती घेतली.