अणुऊर्जेमुळे औष्णिक प्रकल्पांतील प्रदूषणही कमी होणार - डॉ. आर. चिदंबरम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 05:54 AM2019-09-17T05:54:30+5:302019-09-17T05:54:40+5:30
वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधील प्रदूषणही कमी करता येणार आहे, असे देशाचे माजी केंद्रीय प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांनी सांगितले.
मुंबई : अणुऊर्जेच्या वापराद्वारे औष्णिक वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधील प्रदूषणही कमी करता येणार आहे, असे देशाचे माजी केंद्रीय प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांनी सांगितले. तसेच देशात ७०० मेगावॉट क्षमतेचे दहा अणुऊर्जा रिअॅक्टर सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात ‘अंतराळ व अणुऊर्जा क्षेत्रात भारत’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते.
डॉ. आर. चिदंबरम म्हणाले, भारत आर्थिक क्षेत्रात विकसनशील आहे; परंतु अंतराळ विज्ञान व अणुऊर्जा क्षेत्रात विकसित देशांच्या यादीत आहे. देशात ७०० मेगावॉट क्षमतेचे दहा अणुऊर्जा रिअॅक्टर सुरू होणार असून त्यामुळे भारताची अणुऊर्जा क्षमता २०३१ पर्यंत २२,४८० मेगावॉट इतकी होईल.
तर इस्रोचे माजी अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी सांगितले की, भारताने क्रायोजनिक इंजीन तयार केले असून जीएसएलव्हीच्या तीन मोहिमांमध्येही यश मिळविले आहे. येत्या काळामध्ये उपग्रह वाहनाचा पुनर्वापर करण्याचा विचार सुरू आहे.