Join us

प्रकल्पग्रस्तांच्या घरावर डल्ला

By admin | Published: February 11, 2015 12:28 AM

प्रकल्पागस्तांसाठी राखीव असलेल्या मुंबई महापलिकेच्या घरांची बनावट कागदपत्रे तयार करुन ती निव्वळ ४ ते ५ लाखात विकण्याचा धंदा

समीर कर्णुक, मुंबईप्रकल्पागस्तांसाठी राखीव असलेल्या मुंबई महापलिकेच्या घरांची बनावट कागदपत्रे तयार करुन ती निव्वळ ४ ते ५ लाखात विकण्याचा धंदा सध्या मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथे सुरु आहे. पालिकेच्या विविध सहाय्यक आयुक्तांच्या बनावट सह्या तयार करुन सुमारे चारशेहून अधिक घरे विकण्यात आली असून हे कृत्य परिसरात संघटित टोळीकडून बिनबोभाटपणे सुरु आहे,त्यातून आतापर्यत कोट्यावधीची कमाई करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पालिकेच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संगनमताने हे कृत्य सुरु असल्याचा आरोप स्थानिक रहिवास्यांकडून करण्यात येत आहेत. शहरातील रस्ता रूंदीकरण किंवा अन्य प्रकल्पांमध्ये बाधीत झालेल्या झोपडीधारकां चे पुनर्वसन करण्यासाठी म्हाडा, एमएमआरडीएने उभारलेल्या इमारतींमध्ये महापालिकेसाठी काही सदनिका राखीव आहेत. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात संबंधीत यंत्रणांनी उभारलेल्या इमारतींमध्ये शिवशाही पुनर्वसन योजनेअंतर्गत प्रकल्पबाधीतांसाठी सदनिका राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये याच परिसरात राहणाऱ्या माफियांनी हस्तांतरणाची बनावट कागदपत्रे तयार केली. त्यावर पालिका सहाय्यक आयुक्तांच्या बनावट सह्या केल्या. त्यानंतर रातोरात या घरांमध्ये घुसखोरी केली. अशा प्रकारे गेल्या ४ ते ५ वर्षात याठिकाणी केवळ पालिकेच्याच ४०० पेक्षा अधिक घरांवर घुसखोरी केल्याचे उघड झाले असून म्हाडा आणि एमएमआरडीएच्या देखील शेकडो घरांवर अशाच प्रकारे घुसखोरी झाल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करतात.