शहरात अपघातांची संख्या ६१ ने वाढली
By admin | Published: July 19, 2014 12:43 AM2014-07-19T00:43:19+5:302014-07-19T00:43:19+5:30
शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात रस्ते अपघातांतील मृतांची जरी संख्या १२ ने कमी झाली असली तरी अपघातांची संख्या मात्र ६१ ने वाढली आहे
ठाणे : शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात रस्ते अपघातांतील मृतांची जरी संख्या १२ ने कमी झाली असली तरी अपघातांची संख्या मात्र ६१ ने वाढली आहे. या वर्षातील जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ७९२ अपघातांची नोंद झाली असून, त्यामध्ये १३१ जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. ५६२ जण जखमी झाले आहेत. यंदाही मयत आणि जखमींमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूककोंडीबरोबर अपघातांची संख्या वाढली आहे. यामध्ये २०१३ (जाने.-जून) ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात एकूण ७३१ अपघात झाले, तर १४३ जणांचा मृत्यू झाला आणि ५५७ जायबंदी झाले होते़ २०१३मध्ये प्राणांतिक १३५ अपघात झाले असून गंभीर अपघात ३०९, किरकोळ अपघात १८५, तर कोणी जखमी नसलेल्या १०२ अपघातांची नोंद झाली होती.
शहरातील अपघात वाढते आहेत. मात्र अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदत मिळत नाही. त्यामुळे अनेक जण जायबंदी होतात. काहींना जीवाला मुकावे लागते. हे लक्षात घेऊन ठाणे शहर पोलिसांनी अपघातस्थळी सर्वात आधी पोहोचणाऱ्या वाहतूक पोलिसांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)