पहिल्या लाटेच्या तुलनेत राज्यातील सक्रिय रुग्णांत ७२ टक्क्यांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:06 AM2021-07-30T04:06:31+5:302021-07-30T04:06:31+5:30
पहिल्या लाटेच्या तुलनेत राज्यातील सक्रिय रुग्णांत ७२ टक्क्यांनी घट लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात १७ सप्टेंबर रोजी ३ ...
पहिल्या लाटेच्या तुलनेत राज्यातील सक्रिय रुग्णांत ७२ टक्क्यांनी घट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात १७ सप्टेंबर रोजी ३ लाख १ हजार ७५२ सक्रिय रुग्ण होते, तर २२ एप्रिल २०२१ साली ही संख्या ६ लाख ९९ हजार ८५८ वर गेली होती. सद्यस्थितीत राज्यात ८२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात पहिल्या लाटेत सर्वाधिक सक्रिय रुग्ण होते, यात ७२.८८ टक्क्यांनी घट झाली आहे.
राज्यात उपचाराधीन असलेल्या ८२ हजार रुग्णांपैकी ३४ हजार ६०६ रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. हे प्रमाण ३९ टक्के आहे. लक्षण विरहित किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण ५४ हजार १२८ आहेत, हे प्रमाण ६१ टक्के आहे. तर गंभीर रुग्णांची संख्या १२ हजार ६६५ इतकी आहे, हे प्रमाण १४.२७ टक्के आहे. अतिदक्षता विभागात असणारे रुग्ण १ हजार ७९६ असून ऑक्सिजनवर असणारे रुग्ण २ हजार ६६३ इतके आहेत. अतिदक्षता विभागाबाहेर ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८ हजार २०६ आहे.
राज्यातील पाच जिल्ह्यांत उपचाराधीन रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. त्याखालोखाल ठाणे, कोल्हापूर सांगली आणि सातारा हे जिल्हे आहेत. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ४९ हजार २२२ रुग्ण या पाच जिल्ह्यांत असून हे प्रमाण ५९.९७ टक्के आहे.
सिंधुदुर्ग वगळता सर्व जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांची संख्या पहिल्या लाटेतील सर्वाधिक सक्रिय रुग्ण संख्येपेक्षा कमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या लाटेत सर्वाधिक सक्रिय रुग्ण १ हजार ३४६ इतके होते. २७ जुलैप्रमाणे ही संख्या १ हजार ९२१ असून ४२.७२ टक्क्यांनी वाढली आहे.