राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या पोहोचणार तीन लाखांच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:07 AM2021-03-21T04:07:10+5:302021-03-21T04:07:10+5:30
आरोग्य विभागातील वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती; यंत्रणांसमोर काेराेना संसर्ग नियंत्रणाचे आव्हान लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागील आठवडाभर सलग १५ ...
आरोग्य विभागातील वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती; यंत्रणांसमोर काेराेना संसर्ग नियंत्रणाचे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील आठवडाभर सलग १५ ते १७ हजारांच्या घरात असणारे काेराेनाचे दैनंदिन रुग्ण आता थेट २५ हजारांवर पोहोचले आहेत. काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंत्रणांसमोर संसर्ग नियंत्रणाचे आव्हान उभे राहिले आहे. सध्या दीड लाखाच्या घरात असणारे राज्यातील उपचाराधीन रुग्ण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तीन लाख होण्याची शक्यता आरोग्य विभागातील वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली.
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत राज्यातील नवीन रुग्णांचे प्रमाण ६३.२१ टक्के इतके आहे. याविषयी अधिक माहिती देताना राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, राज्यातील रुग्णवाढीस स्थानिक कारणे आहेत, त्यात नियमांचे उल्लंघन, सामान्यांचा निष्काळजीपणा, अलगीकरणाचे नियम न पाळणे, सामाजिक अंतर न राखणे अशा गोष्टी सर्रास घडताना दिसत आहेत. परिणामी, यातून संसर्ग पसरून रुग्णवाढ होत आहे. येत्या काही दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांचा टप्पा गाठणार आहे, ही चिंताजनक बाब आहे. यंत्रणांनीही रुग्णवाढीला आळा घालण्यासाठी चाचण्यांच्या संख्येत वाढ, नियमांची कठोर अंमलबजावणी, सहवासितांचा शोध, लवकर निदान व उपचार यावर अधिकाधिक भर दिला आहे.
गेल्या वर्षी ११ सप्टेंबर रोजी राज्यात सर्वाधिक २४ हजार ८९६ रुग्ण एका दिवसात आढळले होते. राज्याने दैनंदिन कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठली आहे. १८ मार्च रोजी २५ हजार ८३३ नवीन रुग्ण आढळून आले, तर १९ मार्च रोजी दिवसभरात २५ हजार ६८१ रुग्णांची नोंद झाली. सध्या राज्यात १ लाख ७७ हजार ५६० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.