केबल ग्राहकांची संख्या वाढली
By admin | Published: February 20, 2016 02:26 AM2016-02-20T02:26:46+5:302016-02-20T02:26:46+5:30
मुंबई शहराच्या उत्तुंग इमारतीपासून झोपडपट्टीमधील गल्लीबोळांपर्यंत केबलसेवा पुरवणाऱ्या चालकांना मनोरंजन कर विभागाने चांगलाच दणका दिला आहे
चेतन ननावरे, मुंबई
मुंबई शहराच्या उत्तुंग इमारतीपासून झोपडपट्टीमधील गल्लीबोळांपर्यंत केबलसेवा पुरवणाऱ्या चालकांना मनोरंजन कर विभागाने चांगलाच दणका दिला आहे. कमी कनेक्शन दाखवून कर चुकवणाऱ्या केबल चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यास विभागाने सुरुवात केली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच शहरातील अधिकृत केबल ग्राहकांमध्ये ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या तिजोरीत दरवर्षी ५५ लाखांहून अधिक महसुलाची भर पडणार आहे.
प्रशासनाने मोहीम सुरू करण्याआधी मुंबई शहरात दोन लाख ७५ हजार केबल कनेक्शन्सची नोंद करण्यात आली होती. मोहीम सुरू झाल्यानंतर हाच आकडा सुमारे ४ लाखांपर्यंत पोहोचला आहे. त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. केबलच्या प्रत्येक कनेक्शनमागे प्रशासनाला मनोरंजन करापोटी ४५ रुपये मिळतात.
मनोरंजन कर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, झोपडपट्टी आणि जुन्या चाळींमधील गल्लीबोळापर्यंत विस्तारलेल्या केबलच्या नेटवर्कवर भौगोलिक व तांत्रिकदृष्ट्या लक्ष ठेवणे कठीण होते. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे प्रत्येक केबल कनेक्शन्स तपासणेही अशक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक एमएसओंकडून (मल्टी सिस्टीम आॅपरेटर) एकूण केबल कनेक्शन्सची यादी मागितली. ती देण्यास एमएसओंकडून टाळाटाळ केली जात होती. संबंधित केबल चालकांकडून माहिती देण्यास विलंब होत असल्याचे कारण दिले जात होते. त्यामुळे प्रशासनाने थेट एमएसओंवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली. त्यामुळे आपोआपच एमएसओंना केबलचालकांची माहिती देणे भाग पडले.
१९९५ च्या केबल नेटवर्क अॅक्टनुसार प्रशासनाने या कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास केबलचा परवाना रद्द करण्याची तरतूद आहे. मुंबईत एकूण सात एमएसओ आहेत. त्यापैकी माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एमएसओंना नोटिसा पाठवून प्रशासनाने कायद्याचा बडगा उगारला. त्याची दहशत घेऊन सर्वच एमएसओंनी प्रशासनासोबत बैठक घेतली. काही बैठकांनंतर एमएसओंनी कनेक्शन्सची माहिती देण्यास सुरुवात केली़
हा खेळ आकड्यांचा...
केबल प्रसारणाचे हक्क एमएसओकडे असले तरी थेट ग्राहकांपर्यंत सेवा देण्याचे काम केबलचालक करतात. शहरात एकूण एक हजार ११४ केबल चालकांकडून दोन लाख ७५ हजार कनेक्शन्सची माहिती देण्यात आली होती. प्रत्येक ग्राहकाकडून कनेक्शनसाठी चालक २५० ते ३०० रुपये आकारतात. अशाप्रकारे आतापर्यंत लपवण्यात आलेल्या सव्वालाख कनेक्शन्समधून दरमहिन्याला तीन कोटींहून अधिक काळा पैसा जमा होत होता.