मुंबई : मुंबईत गेले काही दिवस ८ ते ११ हजारांवर रुग्ण आढळून येत आहेत. सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या ७ हजारांच्या घरात आढळून आली. गुरुवारी ७,४१० नवे रुग्ण आढळून आले असून, ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्णसंख्या स्थिर असली तरी मृत्यूच्या आकड्यांत मात्र वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे दिवसभरात रुग्णनिदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे.
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ६ लाख ९ हजारांवर पोहोचला आहे, तर मृतांचा आकडा १२ हजार ५७६ झाला आहे. ८ हजार ९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या ५ लाख ११ हजार १४३ वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या ८३ हजार ९५३ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ११४ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, तर १ हजार १९८ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात ४६ हजार ८७४ चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत ५१ लाख २२ हजार २६ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.