कोरोना रुग्ण घटल्याने परप्रांतीयांनी धरली मुंबईची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:06 AM2021-06-24T04:06:45+5:302021-06-24T04:06:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, त्यामुळे आता ...

As the number of corona patients decreased, foreigners waited for Mumbai | कोरोना रुग्ण घटल्याने परप्रांतीयांनी धरली मुंबईची वाट

कोरोना रुग्ण घटल्याने परप्रांतीयांनी धरली मुंबईची वाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, त्यामुळे आता मूळगावी गेलेल्या परप्रांतीय कामगारांनी मुंबईची वाट धरली आहे.

फेब्रुवारीमध्ये काेरोनाची दुसरी लाट आल्यानंतर हजारो परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतले होते; मात्र मे आणि जून या दोन महिन्यांत मुंबई महानगरात आलेल्या मेल, एक्स्प्रेसमधून २८ लाख प्रवासी दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक प्रवासी मध्य रेल्वेवरून दाखल झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

फेब्रुवारीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे मार्चच्या अखेरपासून राज्य सरकारने मुंबईसह राज्यभर निर्बंध लागू केले. त्यामुळे धास्तावलेले कामगार कुटुंबांसह आपापल्या गावी रवाना झाले. परराज्यांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन रेल्वेने विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडल्या. अनलॉक होताच बिघडलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत होण्याची चिन्हे दिसताच परराज्यात गेलेले मजूर, कामगार पुन्हा मुंबई महानगराकडे येऊ लागले आहेत.

मध्य रेल्वेवर दर दिवशी सीएसएमटी, एलटीटी, ठाणे, कल्याण येथे उत्तरेकडून व दक्षिणेकडून गाड्या येतात. दरभंगा, वाराणसी, गोवा, उत्तराखंड, केरळ, भुवनेश्वर, हैदराबाद, बंगळूरु यासह पश्चिम रेल्वेवरील जोधपूर, अमृतसर, गुजरात, नवी दिल्ली, गोरखपूर, मुझफ्फरपूर इत्यादी विभागातून मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनसपर्यंत गाड्या दाखल होतात. मे व जून या दोन महिन्यात पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमधून मुंबई महानगरात एकूण ७ लाख ८ हजार ९५६ जण, तर मध्य रेल्वेच्या गाड्यांमधून परराज्यातून महाराष्ट्रात २८ लाख २६ हजार २२६ जण दाखल झाले आहेत. यात मुंबई विभागात सुमारे २१ लाख प्रवासी आले आहेत. मे महिन्यात पश्चिम रेल्वेवर मुंबई विभागात दर दिवशी १५ हजार १०२ प्रवासी आणि जून (१ जून ते १० जूनपर्यंत) महिन्यात २४ हजार प्रवासी येत होते.

Web Title: As the number of corona patients decreased, foreigners waited for Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.