मुंबई : चेज द व्हायरस, मिशन झिरो, ट्रेसिंग-ट्रॅकिंग-टेस्टिंग-ट्रिटिंग या चतु:सूत्रीनुसार करण्यात येत असलेल्या कार्यवाहीमुळे मुंबई महापालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांना यश येत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे धारावी येथे रविवारी शून्य रुग्ण संख्या नोंदविण्यात आल्याचा दावा मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा केला आहे.
मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी धारावीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची नोंद शून्य झाली आहे. माहीममध्ये ७ आणि दादर येथेही नोंद ६ झाली आहे. एकूण हा आकडा १३ आहे. मुळात धारावी मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. येथे झोपड्या, चाळी आणि इमारती मोठ्या संख्येने आहेत. दाट लोकवस्तीही आहे. याच कारणांमुळे तेथे मोठ्या प्रमाणावर कोरोना पसरला होता. मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे मुंबईत कोरोना आटोक्यात आला. उत्सव, सणावर बंधने घालत गर्दी कमी करून कोरोना नियंत्रणात आणण्यात महापालिकेला यश आले.
धारावी आणि पश्चिम उपनगरात मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली होती आणि कोरोना रुग्ण कमी करण्यात यश मिळाले होते. आजही कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी धारावीत सातत्याने चाचणी होत असून, जनजागृती केली जात असल्याने येथे कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यात यश येत आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
------------
धारावी पॅटर्न
दाट लोकवस्ती असलेल्या धारावीसारख्या भागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने ज्या उपाययोजना केल्या आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे त्या भागातील संसर्ग रोखण्यात यश आले, अशा या धारावी पॅटर्नची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. कोविडचा मुकाबला करण्यासाठी गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावले उचलली गेल्यानेच कोविड वाढीचा वेग कमी झाला आहे.
------------
एकूण रुग्ण संख्या
धारावी : ६ हजार ९०१
दादर : ९ हजार ६९८
माहीम : १० हजार २१
------------