मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात 2608 रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 47,190 वर पोहोचला आहे. त्यासोबतच, आज 821 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 13,404 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. तर आता राज्यात एकूण 32,201 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पुढे गेली असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आज 50 हजारांच्याजवळ पोहोचला आहे. राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रुग्णांची संख्या वाढतच आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राज्यातील आजची कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवाडी जाहीर केली आहे. राज्यात आज तब्बल 2608 रुग्ण वाढले असून शुक्रवारच्या तुलनेत रुग्णवाढीचा हा आकडा कमी आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात शुक्रवारी 2940 नवे कोरोनाबाधित आढळून आले होते. आज रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत कमी असली तरी, ही वाढ चिंताजनक आहे.