राज्यात कोरोना रुग्णसंख्येने ९० हजारांचा टप्पा ओलांडला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 07:47 AM2020-06-10T07:47:57+5:302020-06-10T07:48:44+5:30
एकूण ३,२८९ मृत्यू ; दिवसभरात २,२५९ नवीन रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी वाढत असताना कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने ९० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात २,२५९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १२० जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या ९० हजार ७८७ झाली असून मृतांचा आकडा ३ हजार २८९ झाला आहे.
मुंबई, पुणे या महानगरांबरोबरच अनेक शहरांमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात दिवसभरात तब्बल ११६ जणांना बाधा झाल्याची नोंद झाली. कोकणातील सिंधुदुर्गमध्येही ५ नवे रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या १३५ झाली आहे.
राज्यात मंगळवारी झालेल्या १२० मृत्यूंमध्ये ८० पुरुष तर ४० महिला आहेत. मुंबई ५८, ठाणे १३, मीरा-भार्इंदर ६, पनवेल ३, वसई-विरार २, नवी मुंबई १, नाशिक ३, पुणे १६, सोलापूर २, रत्नागिरी १, औरंगाबाद १०, (पान ७ वर)
सलग सातव्या दिवशी मोठी रुग्णसंख्या वाढ
देशात सलग सातव्या दिवशी मोठी रुग्णसंख्या वाढ नोंदविण्यात आली. देशात मागील २४ तासांत ७,४६६ नवे रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णांची संख्या आता २ लाख ६६ हजारांवर गेली आहे. देशात आता १,२९,८१३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर १,२९,३१४ रुग्ण बरे झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या मातोश्री माधवी राजे शिंदे यांची कोविड-१९ ची चाचणी सकारात्मक आली असून, त्यांना येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
-आणखी वृत्त/देश-परदेश
35 लाख झाले जगभरात बरे
जगभरात आतापर्यंत ३५ लाखांवर लोक बरे झाले आहेत. जगाची एकूण रुग्णसंख्या ७२ लाखांवर गेली आहे, तर जगातील कोरोनामुळे झालेल्या बळींची संख्या ४ लाख १0 हजारांवर गेली.
जगात सर्वाधिक बाधित रुग्ण, तसेच सर्वाधिक मृत्यूही अमेरिकेत झाले आहेत.
रुग्णसंख्येच्या बाबतीत अमेरिकेनंतर ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन व भारताचा क्रमांक लागतो.