वेसाव्यात कोरोना रुग्णांची संख्या झाली ३४
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 04:07 PM2020-04-25T16:07:13+5:302020-04-25T16:09:25+5:30
एकीकडे के पश्चिम वॉर्ड मध्ये कोरोना रुग्णांनी 250 चा आकडा पार केला असून आता येथील वेसावे कोळीवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या आज 34 झाली आहे.
वेसावे कोळीवाड्यात वरळी पॅटर्न अंमलात आणा
मनोहर कुंभेजकर
मुंबई : एकीकडे के पश्चिम वॉर्ड मध्ये कोरोना रुग्णांनी 250 चा आकडा पार केला असून आता येथील वेसावे कोळीवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या आज 34 झाली आहे. वरळी कोळीवाड्यात दि, 29 मार्च रोजी 4 कोरोना रुग्ण सापडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर खळबळ माजली होती.त्यावेळी पालिका प्रशासन व शासनाने कडक पावले उचलून येथील नागरिकांची घरोघरी जाऊन कोरोना टेस्ट केली.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेतर्फे सॅनिटायझेशन व नागरिकांना क्वारंटाईन केले. हा परिसर लॉकडाऊन केला.नागरिकांनी घराबाहेर निघू नये म्हणून मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी खास वरळी कोळीवाड्यात येऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नका असे आवाहन केले.आणि वरळी कोळीवाडा पॅटर्न येथे यशस्वी होऊन सध्यातरी येथे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आहे.
वेसावे कोळीवाड्यात कोरोना रुग्णांची रोज वाढती संख्या लक्षात घेता येथे वरळी पॅटर्न अंमलात आणा अशी आग्रही मागणी वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.गेली तीन दिवस येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून हा भाग कम्युनिटी स्प्रेड व्हारसकडे जात असून वेसावे कोळीवाडा हा तिसऱ्या स्टेज मध्ये पोहचण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.वेसावे कोळीवाड्याच्या हॉटस्पॉटच्या ठिकाणी मास स्क्रिनिग व फिव्हर स्क्रिनिगची व्यवस्था तातडीने उपलब्ध करून दिल्यास संशयित कोरोना रुग्णाला शोधून त्यांचे अन्य ठिकाणी क्वारंटाईन करता येईल.त्यामुळे कोव्हिड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कडक पावले उचलण्याची भूमिका त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केलीे आहे.
येथे कोरोनाचे 14 रुग्ण सापडल्याने आपण येथील लोकप्रतिनधी व एक महिला आमदार म्हणून रस्त्यावर उतरून वर्सोवा पोलिस ठाणे व पालिकेच्या मदतीने दि,18 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता वेसावे कोळीवाडा सील केला होता.मात्र आजही नागरिक रस्त्यावर बाहेर फिरत असून पोलिसांकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत लव्हेकर यांनी व्यक्त केले. येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील कोळी बांधव हावलदिल झाले असल्याने पालिका प्रशासनाकडून तातडीने पावले उचलून क्वारंटाईन सुविधा,जलद कोरोना टेस्टिंग प्रणाली,अँम्ब्युलन्सची उपलब्धता याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे असे मत कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले. आज वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी के पश्चिम वॉर्ड मध्ये जाऊन येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.गुरुनार खान यांची भेट घेऊन आमच्या अडचणींचा पाढा त्यांच्या समोर मांडला अशी माहिती टपके यांनी दिली.
लोकमत वेसावे कोळीवाड्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.दि, 18 एप्रिल रोजी सर्वप्रथम वेसाव्यात कोरोनाचे झाले 10 रुग्ण अशी बातमी लोकमत ऑनलाईन व लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्याने येथील सद्यस्थिती पालिका प्रशासन व राज्य शासनाच्या नजरेत आणून दिल्या बद्धल येथील कोळीबांधवांनी लोकमतला खास धन्यवाद दिले होते.आजही सलग दुसऱ्या दिवशी वेसावकरांनी येथे कडकडीत जनता कर्फ्यू पाळला असल्याची माहिती वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय व सरचिटणीस राजहंस लाकडे यांनी लोकमतला दिली. आमदार लव्हेकर यांनी लोकमतला सांगितले की,के पश्चिम वॉर्डमध्ये पाठपुरावा करत असतांना असे लक्षात आले की,येथे केवळ दोन अँम्ब्युलन्स असल्याने येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना रस्त्यात,वस्तीत गल्ली बोळात अँम्ब्युलन्सची खूप वेळ वाट बघावी लागते.येथील पालिकेचे अधिकारी अँम्ब्युलन्सची मागणी करत असतांना त्यांना देखिल अँम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही.हा भाग रेड झोनमध्ये असल्याने येथे किमान 6 अँम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार लव्हेकर यांनी केली आहे. अँम्ब्युलन्स प्रमाणे कोरोना रुग्णांना ठेवण्यासाठी पुरेशी हॉस्पिटल देखिल उपलब्ध नाही.काल दुपारी वेसावे येथे 9 कोरोना रुग्णांना बेडच उपलब्ध नव्हते.खास करून डायलिसीस वर असलेल्या रुग्णांची सोय ही
डायलिसीस सेंटरला करावी लागते.मात्र अनेक खाजगी हॉस्पिटल हे अश्या रुग्णांना डायलिसीस करण्यास तयार होत नाही.अखेर पद्मश्री व प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक डॉ.तात्याराव लहाने यांना येथील कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांनी त्वरित परिमंडळ 4 चे उपायुक्त रणजित ढाकणे यांच्याशी संपर्क साधल्यावर मग कुठे येथील कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध झाले.त्यामुळे के पश्चिम वॉर्डमध्ये रुग्णांलयाची पुरेशी उभी करणे गरजेचे असल्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती लव्हेकर यांनी शेवटी दिली.