पूर्व उपनगरामध्ये वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:08 AM2021-02-16T04:08:27+5:302021-02-16T04:08:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई महानगर क्षेत्रामधील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई महानगर क्षेत्रामधील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच काही दिवसांपासून मुंबईतील चेंबूर, कुर्ला, टिळकनगर आणि मुलुंड परिसरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला होता. दिवसाला सरासरी ३०० ते ४०० रुग्ण मुंबईत आढळून येत होते. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून मुंबईत दिवसाला सरासरी ६०० ते ७००च्या संख्येत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर हा ०.१४ टक्के एवढा आहे. त्यातच चेंबूर, टिळकनगर परिसरांचा समावेश असणाऱ्या एम पश्चिम विभागाचा दर ०.२८ टक्के आहे. मुलुंडचा समावेश असणाऱ्या टी विभागाचा ०.२२ आहे. आणि कुर्ला परिसराचा समावेश असणाऱ्या एल विभागाचा दर ०.१७ एवढा आहे. उपनगरातील परिसरांमधील हा रुग्णवाढीचा दर मुंबईतील इतर परिसरांच्या तुलनेत जास्त आहे. हेच लक्षात घेता पालिकेतर्फे या परिसरांमध्ये तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये तापमान तपासणी, ऑक्सिजन तपासणी व संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच कुर्ला टर्मिनस येथेही परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.