विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात एकूण चाचण्यांची संख्या कायम ठेवताना मुंबईतील चाचण्यांची संख्या मात्र ५० टक्क्यांहून अधिक संख्येने कमी केल्या आहेत आणि आता राज्यात कोरोनाबळींची संख्या झपाट्याने वाढत आहे, याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून लक्ष वेधले आहे.
मुंबईत मृत्यू प्रमाणपत्रात नैसर्गिक मृत्यू किंवा अन्य कारणे देण्यात येत असल्याच्या प्रकाराकडेही त्यांनी या पत्रातून लक्ष वेधले आहे. १ मे रोजी राज्यातील एकूण चाचण्यांमध्ये मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे ५६ टक्के होते. याचा अर्थ अर्ध्याहून अधिक चाचण्या मुंबईत होत होत्या. १५ मे रोजी हे प्रमाण ४०.५ टक्क्यांवर आणण्यात आले आणि आता ३१ मे रोजीची आकडेवारी पाहिली तर एकूण महाराष्ट्रातील चाचण्यांच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे २७ टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच पूर्वी होणाऱ्या चाचण्यांपैकी ५० टक्क्यांहून कमी हे प्रमाण आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या ही चिंताजनक बाब आहे.
एकिकडे चाचण्यांची संख्या कमी होणे आणि दुसरीकडे कोरोनाबळींच्या संख्येने नवीन उच्चांक गाठले जात आहेत. २७ मे रोजी त्या कालखंडापर्यंतच्या सर्वाधिक १०५ बळींची नोंद झाली होती. २९ मे रोजी ही संख्या ११६ वर पोहोचली आणि आता जून रोजी तर १२२ बळी गेले. मुंबईच्या बाबतीत विचार केला तर आतापर्यंतचे सर्वाधिक ६४ बळी ३० मे रोजी गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येकी ४९ बळी एकट्या मुंबईत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.