नामदेव मोरे, नवी मुंबईदेश व राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांपेक्षा महापालिका निवडणुकीमधील उमेदवारांची संपत्ती जास्त असल्याचे प्रतिज्ञापत्रांतून स्पष्ट झाले आहे. १०० पेक्षा जास्त उमेदवार कोट्यधीश असून त्यांनी व्यावसायिक मालमत्ता व जमिनीमध्ये गुंतवणूक केली आहे. संपत्तीचे बाजारमूल्य कित्येक पटीने जास्त असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. नवी मुंबई महापालिकेप्रमाणेच नगरसेवक व इच्छुक उमेदवारही श्रीमंत आहेत. नवी मुंबईवर तीन दशकांपासून राज्य करणाऱ्या गणेश नाईक व त्यांच्या मुलांपेक्षाही नगरसेवकांची मालमत्ता कित्येक पटीने जास्त आहे. युतीमुळे तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करणाऱ्या भाजपाच्या दिलीप तिडके यांच्याकडे तब्बल ६५ कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आहे तर विद्यमान महापौर सागर नाईक हे साडेतीन कोटींचे धनी आहेत. राष्ट्रवादीचे नवीन गवते व अपर्णा गवतेही श्रीमंतांच्या यादीत असून दिघा येथे त्यांची तब्बल ४ एकर जमीन आहे. राष्ट्रवादीचे अनंत सुतार, संजय पाटील, निशांत पाटील, विवेक पाटील, शशिकांत राऊत, शिवसेनेचे विठ्ठल मोरे, काँग्रेसच्या वैजयंती भगत, मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांच्यासह १०० पेक्षा जास्त उमेदवार करोडपती आहेत. नगरसेवक व इतर उमेदवारांनी व्यवसायासह ठाणे, रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जमिनी घेतल्या असून फार्महाऊस बांधले आहेत.
कोट्यधीश उमेदवारांची संख्या शतकपार
By admin | Published: April 10, 2015 3:57 AM