Join us

राज्यात दैनंदिन काेराेना चाचण्यांचे प्रमाण एक लाखाहून अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:07 AM

आराेग्य विभाग; प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे १ लाख ४१ हजार चाचण्यास्नेहा मोरेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोना संसर्गाच्या ...

आराेग्य विभाग; प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे १ लाख ४१ हजार चाचण्या

स्नेहा मोरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंतेचे वातावरण आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांत राज्यातील रुग्णांचे प्रमाण तब्बल ६२.९१ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांत राज्यातील दैनंदिन चाचण्यांची क्षमता वाढविली असून, दररोज एक लाख किंवा त्याहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे १ लाख ४१ हजार ८५६ चाचण्या करण्यात येत आहे. मागील वर्षी ३१ मे रोजी हे प्रमाण केवळ ३ हजार ४१८ इतके होते. त्यानंतर चाचण्यांच्या संख्येत टप्प्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. राज्यात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून चाचण्यांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले. ४ मार्च रोजी ८५,७७३ चाचण्या करण्यात आल्या. त्यांत ८,९९८ रुग्ण आढळले; तर १५ मार्च रोजी १ लाख ७ हजार ५३६ चाचण्या कऱण्यात आल्या; त्यात १६,६२० रुग्णांची नोंद झाली.

राज्यात गुरुवारी १ लाख २० हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून, ३१ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. संसर्ग नियंत्रणासाठी राज्य सरकारकडून शोध, निदान, उपचारांवर अधिकाधिक भर दिला जात आहे. दुसरीकडे, लसीकरण मोहीम विस्ताराचे कामही वेगाने सुरू आहे. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी आरोग्य विभागासह जिल्हा-तालुका पातळ्यांवर लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

पॉझिटिव्हिटी दर २३ टक्क्यांवर

दि. १४ मार्चला राज्याचा काेराेना पॉझिटिव्हिटी दर १५.४६ टक्के हाेता. २३ मार्चला ताे थेट २३.६३ टक्के झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. १ ते १५ मार्चदरम्यान राज्यात १ लाख ७४ हजार ३९४ रुग्णांची नोंद झाली. यात सरासरी १९,६२६ दैनंदिन रुग्ण आढळले, तर १६ ते २३ मार्चदरम्यान २ लाख ३ हजार ५६२ रुग्णांची नोंद झाली असून, सरासरी २५,४४५ दैनंदिन रुग्ण आढळले.

दैनंदिन चाचण्या; काेराेना रुग्णांची आकडेवारी

तारीखदैनंदिन चाचण्यादैनंदिन रुग्ण

१३ मार्च९७,०५७१५,६०२

१४ मार्च१,०७,५३६१६,६२०

१५ मार्च९१,८७०१५,०५१

१६ मार्च१,०५,३६३१७,८६४

१७ मार्च१,१८,९९३२३,१७९

१८ मार्च१,२०,३२५२५,८३३

१९ मार्च१,२६,१५४२५,६८१

२० मार्च१,३२,९९४२७,१२६

२१ मार्च १,३७,२२६३०,५३५

२२ मार्च १,०५,२९७२४,६४५

२३ मार्च१,२१,४३१२८,६९९

२४ मार्च१,२०,२९२३१,८५५