Join us

मुंबईकरांची ‘लाइफ लाइन’ नव्हे ‘डेथलाइन’! ठाणे ठरलं सर्वाधिक जीवघेणं स्थानक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 8:45 AM

घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत पळणा-या मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे मुंबई लोकल. दररोज लोकलमधून सुमारे 75 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, हीच जीवनवाहिनी मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा ठरू पाहात आहे. रेल्वे प्रशासन रूळ ओलांडू नका, लटकून प्रवास करू नका, अशा सूचना वारंवार देत असते, परंतु प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे बहुतांशी अपघात घडतात, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे, तर तांत्रिक बिघाड, अन्य कारणास्तव उशिराने धावणा-या ट्रेन, अरुंद पूल आदी अनेक समस्या अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

मुंबई : घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत पळणा-या मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे मुंबई लोकल. दररोज लोकलमधून सुमारे 75 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, हीच जीवनवाहिनी मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा ठरू पाहात आहे. गेल्या वर्षभरात लोकलने प्रवास करणा-या तब्बल 3 हजार 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, जवळपास 3 हजार 345 प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीतून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.माहिती अधिकार कार्येकर्ते समीर झव्हेरी यांनी लोहमार्ग पोलिसांकडे जानेवारी ते डिसेंबर 2017 या कालावधीतील रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू आणि अपघातांची आकडेवारी सादर करण्याची विनंती माहितीच्या अधिकारांतर्गत केली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात विविध कारणांमुळे मध्य रेल्वेवर 1 हजार 928 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे व 1805 प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करताना 1 हजार 086 प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे, तर 1540 प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात 3 हजार 14 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 3 हजार 345 प्रवासी अपघातात जखमी झाले.हार्बर मार्गावर वर्षभरात झालेल्या विविध अपघातांत 22 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 47 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील सर्वाधिक अपघात हे वडाळा रोड स्थानकात घडले आहेत. याच कालावधीत मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात 292 प्रवाशांचा अपघात झाला असून, यात 137 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 155 प्रवासी जखमी झाले आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी स्थानकात गेल्या वर्षभरात 220 अपघात घडले असून, यात 70 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 150 प्रवासी जखमी झाले आहेत.रेल्वे प्रशासन रूळ ओलांडू नका, लटकून प्रवास करू नका, अशा सूचना वारंवार देत असते, परंतु प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे बहुतांशी अपघात घडतात, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे, तर तांत्रिक बिघाड, अन्य कारणास्तव उशिराने धावणा-या ट्रेन, अरुंद पूल आदी अनेक समस्या अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.ठाणे स्थानकात सर्वाधिक मृत्यू-137 प्रवाशांचा गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात अपघाती मृत्यू झाला असून 155 प्रवासी जखमी झाले आहेत.70 प्रवाशांचा गेल्या वर्षभरात पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी स्थानकात अपघाती मृत्यू झाला असून, 150 प्रवासी जखमी झाले आहेत.22 प्रवाशांचा गेल्या वर्षभरात हार्बर मार्गावरून प्रवास करताना मृत्यू झाला असून, 47 प्रवासी जखमी झाले आहेत. 

टॅग्स :मुंबई लोकलभारतीय रेल्वेठाणेअपघात