देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 01:17 AM2019-10-30T01:17:02+5:302019-10-30T06:29:35+5:30

जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी; १० कोटी ५८ लाख जणांनी केला प्रवास

The number of domestic air passengers increased by three per cent over last year | देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांची वाढ

देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांची वाढ

googlenewsNext

मुंबई : देशांतर्गत प्रवास करणाऱ्या हवाई प्रवाशांच्या संख्येत जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत ३.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत १० कोटी ५८ लाख प्रवाशांनी हवाई प्रवास केला. हे प्रमाण गतवर्षी १० कोटी २७ लाख होते.

२०१८च्या सप्टेंबर महिन्यातील प्रवाशांच्या तुलनेत २०१९ सप्टेंबर महिन्यातील प्रवाशांची संख्या १.१८ टक्के वाढली आहे. सप्टेंबर महिन्यातील विमानांची उड्डाणे रद्द होण्यामध्ये तांत्रिक बिघाडाचा मोठा हिस्सा होता. उड्डाणे रद्द होण्यामध्ये ६० टक्के तांत्रिक बिघाड हे कारण होते.
सप्टेंबर, २०१८ मध्ये १ कोटी १३ लाख ९८ हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला होता. यंदा हे प्रमाण वाढून सप्टेंबर महिन्यात १ कोटी १५ लाख ३३ हजार प्रवाशांनी हवाई प्रवास केला. प्रवासी भारमानामध्ये स्पाइसजेटने ९३ टक्के प्रवासी संख्येसह प्रथम स्थान पटकावले, तर गोएअरची प्रवासी संख्या ८६.७ टक्के व इंडिगोची ८६.५ टक्के होती. एअर इंडियाची प्रवासी संख्या आॅगस्ट महिन्यात ८०.९ टक्क्यांवरून घटून ७९ टक्के झाली, तर एअर एशियाची प्रवासी संख्या ८४.७ टक्के व विस्ताराची ८०.३ टक्के होती.

गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी क्षमता वाढली आहे. जानेवारी महिन्यात प्रवाशांची संख्या ९.१ टक्के, फेब्रुवारीत ५.६२ टक्के होती. मार्चमध्ये हे प्रमाण अतिशय कमी म्हणजे ०.१४ टक्के एवढे झाले, तर एप्रिलमध्ये वाढ न होता घट झाली होती. एप्रिल महिन्यात ४.५ टक्क्यांची घट झाली होती. मे मध्ये २.७९, जूनमध्ये ६.१९ टक्के, जुलैमध्ये ३.१ टक्के, आॅगस्टमध्ये ३.८७ टक्के तर सप्टेंबरमध्ये प्रवासी संख्येत १.१८ टक्क्यांची वाढ झाली आहे. पर्यटनाचा हंगाम संपल्याने प्रवाशांच्या संख्येत कमी प्रमाणात वाढ झाल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात आला.

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक उड्डाणे रद्द
विमानांची उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाण सप्टेंबर महिन्यात १.३७ टक्के होते. त्यामध्ये सर्वात जास्त उड्डाणे एअर डेक्कनची रद्द झाली. एअर डेक्कनची ३६ टक्के, पवन हंसची ३१.३७ टक्के, ट्रू जेटची २५.५० टक्के, स्टारएअरची २३.७५ टक्के उड्डाणे रद्द झाली. इंडिगोची ०.५३ टक्के, स्पाइसजेटची ०.४८ टक्के, विस्ताराची ०.२६ टक्के, तर गोएअरची ०.१२ टक्के विमानांची उड्डाणे रद्द झाली. उड्डाणे रद्द होण्यामध्ये प्रमुख कारण तांत्रिक बिघाड हे होेते. तब्बल ६० टक्के उड्डाणे यामुळे रद्द झाली. खराब हवामानामुळे २७.३ टक्के उड्डाणे रद्द करण्यात आली.

Web Title: The number of domestic air passengers increased by three per cent over last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.