लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे संशयित रुग्ण अथवा लक्षणे नसलेले रुग्ण क्वारंटाईन कालावधी पूर्ण करण्याआधीच घराबाहेर पडत असल्याचे समोर आले आहे. यामुळे महापालिकेने होम क्वारंटाईन रुग्णांच्या हातावर शिक्का मारण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला. त्यानंतर घरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही आता झपाट्याने वाढत आहे. जानेवारी अखेरीस जेमेतेम ६० ते ७० हजार मुंबईकर होम क्वारंटाईन होते. मात्र सोमवारी ही संख्या ९६ हजारांवर पोहोचली आहे.
सांताक्रुझ येथील हॉटेलमधून चार प्रवाशांनी पलायन केल्याचे महापौरांनी केलेल्या पाहणीतून उजेडात आले होते. त्यामुळे लक्षणे नसल्याने होम क्वारंटाईन असणाऱ्या बाधित रुग्णांवर आता महापालिकेने लक्ष ठेवले आहे. अशा रुग्णांच्या हातावर पूर्वीप्रमाणे शिक्का मारण्यात येणार आहे. तसेच पालिकेचे विभागीय वॉर रूममधील कर्मचारी दिवसातून सहा वेळा फोन करून ते घरी असल्याची खातरजमा केली जात आहे. प्रतिबंधित इमारतींमधूनही नियम मोडून बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पवई येथील एका प्रतिबंधित इमारतीमधील महिलेविरोधात गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत सध्या सहा हजार ९०० बाधित रुग्ण असून यापैकी २०४३ रुग्णांमध्ये लक्षणे आहेत. तर लक्षणे नसलेले ४५९२ रुग्ण आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित ९६ हजार ५६ नागरिक सध्या होम क्वारंटाईन आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्ण, संशयित लोकांनी अनुक्रमे १४ दिवस व बाधित नसल्याचा अहवाल येईपर्यंत सात दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत ४३ लाख ७९ हजार ८५३ लोकांनी आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे.
२० फेब्रुवारी रोजीपर्यंत बाधित रुग्णांच्या नजीकच्या संपर्कातील ११ हजार ४४९ लोकांचा शोध घेण्यात आला. यापैकी अतिजोखमीच्या गटातील ७०७०, तर कमी जोखमीच्या गटातील ४३७९ लोकांचा शोध लागला. यापैकी अतिजोखमीच्या गटातील लोकांना आवश्यकतेनुसार होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे.
होम क्वारंटाईन - ९६०५६
संस्थामक क्वारंटाईन - ४००
...........................