लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या आठ हजारांच्या आसपास स्थिर झाली आहे. त्यात फारशी घट होत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी दिवसभरात ८ हजार १० नव्या रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ६१ लाख ८९ हजार २५७ इतकी झाली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ७ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर १७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात एकूण १ लाख ७ हजार २०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. आतापर्यंत १ लाख २६ हजार ५६० जण कोरोनामुळे दगावले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ४८ लाख २४ हजार २११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१ लाख ८९ हजार २५७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८१ हजार २६६ व्यक्ती होमक्वारंटाइन, तर ४ हजार ४७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.