मुंबई: बँडस्टँडला सेल्फीचा नाद दोघांच्या जीवावर बेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी शहरातील १५ ठिकाणांना ‘नो सेल्फी झोन’ म्हणून घोषित केले. सध्या ‘नो सेल्फी झोन’चा आकडा २२ वर पोहचला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार या २२ धोकादायक सेल्फी झोनवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. वांद्रे येथे सेल्फीच्या नादात तरन्नुम अन्सारी आणि तिच्या बचावासाठी गेलेल्या रमेश वळुंज या दोघांना जीव गमवावा लागला. मात्र दोन जीव गेल्यानंतरही तरुणाईमध्ये सेल्फीची क्रेझ कायम आहे. त्यामुळे उपाययोजना आणि सावधगिरीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी शहरातील १५ ठिकाणे धोकादायक असून या ठिकाणी सेल्फी काढणे जिवावर बेतू शकते, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांकडून धोकादायक सेल्फी झोनची माहिती मागविण्यात आली होती. पोलिसांकडून जाहीर झालेल्या यादीमुळे हा आकडा २२ वर पोहचला आहे. यामध्ये बँडस्टँड, सायनचा किल्ला, वांद्रे किल्ला, वरळी सीफेस, जुहू बीच, दादर चौपटी, मढ मार्वे बीच, गोराई बीच, वरळीचा किल्ला, मरीन ड्राइव्ह, ससून डॉक, कार्टर रोड येथील आॅटर्स क्लब, माहिम किल्ला, पवई लेक व गिरगाव चौपाटी, गेट वे आॅफ इंडिया, हाजी अली, एम.बी. राऊत मार्ग, पवई हिरानंदानी हॅलीपड, माहिम चौपाटी, या ठिकाणांसह एकूण २२ ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. पर्यटकांची सतत गर्दी असलेल्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी सेल्फीवर बंदी घालण्यासाठी पालिका प्रशासनाची मदत पोलिसांकडून घेतली जाणार आहे. पालिकेकडून अशा ठिकाणी जीवरक्षक तैनात करण्यात येणार असून धोक्याचे फलकही लावण्यात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली. (प्रतिनिधी)
‘नो सेल्फी झोन’चा आकडा २२वर
By admin | Published: March 01, 2016 2:57 AM