रुग्णालयांची संख्या लवकरच १,९००; म. फुले आरोग्य योजनेत ९०० रुग्णालयांचा समावेश
By संतोष आंधळे | Published: June 30, 2024 07:07 AM2024-06-30T07:07:55+5:302024-06-30T07:08:17+5:30
सध्या राज्य हमी सोसायटीच्या या योजनेत राज्यातील एक हजार रुग्णालयांचा यात सहभाग आहे.
संतोष आंधळे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अकरा महिन्यांपूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाने गोरगरीब रुग्णांना वरदान ठरलेली ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना’ राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्याची घोषणा केली होती. या योजनेला आता अंतिम स्वरूप आले असून, जुलै महिन्यात ही योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत राज्यातील ९०० नवीन रुग्णालयांची भर पडणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत रुग्णालयांची संख्या वाढणार असून, १,९०० रुग्णालये होणार आहेत.
सध्या राज्य हमी सोसायटीच्या या योजनेत राज्यातील एक हजार रुग्णालयांचा यात सहभाग आहे. आजारांची संख्या ९९६ वरून १३५६ इतकी केली आहे. या महागाईच्या काळात मध्यमवर्गीयांनाही आरोग्याचे उपचार परवडत नाहीत. ‘महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कवच पाच लाखांवर नेणार’ या मथळ्याचे वृत्त २० जून २०२३ रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. २७ जुलैला सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. त्यामध्ये राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी योजना असून, सर्व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांनाही ती लागू केली गेली आहे. या योजनेंतर्गत उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच देण्यात आले आहे.
अशी असणार योजना?
आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचे कवच असणार आहे. या योजनेत दीड लाखापर्यंतचा खर्च विमा कंपनीतर्फे करण्यात येईल, तर पुढील साडेतीन लाखांचा खर्च करण्याची हमी शासन घेणार आहे. विमा आणि उपचारांची हमी या दोन गोष्टींची या योजनेमध्ये सांगड घालण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये अशाच हायब्रीड पद्धतीने योजना अंमलात आणण्यात आली आहे. प्रीमियम युनायटेड इन्शुरन्स कंपनीला हे काम मिळाले आहे. त्यामुळे आता ह्या योजनेचे काम पूर्ण झाले आहे.
जुलै महिन्यापासून योजना
जुलै महिन्यापासून योजना कार्यान्वित होणार आहे. यामध्ये रुग्णालयांची संख्या वाढविण्यात येणार आहे. या योजनेसाठी ३००० कोटींचा प्रीमियम सरकारला इन्शुरन्स कंपनीला भरावा लागणार आहे. या योजनेचे काम पूर्ण झाले असून, या योजनेचा नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे. विशेष म्हणजे, रुग्णांनी उपचार घेतल्यानंतर त्याचा फॉलोअप सध्या योजनेच्या कार्यालयातून घेण्यात येणार आहे. - रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना.