मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवरील प्रवासी संख्या ८ कोटींवर, मेट्रो संचलन महामंडळाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 09:46 AM2024-02-22T09:46:37+5:302024-02-22T09:49:25+5:30
मेट्रो २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ मार्गिकेने प्रवाशांचा ८ कोटींचा टप्पा पार केला आहे.
मुंबई : डी. एन. नगर ते दहिसर पूर्व मेट्रो २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ मार्गिकेने प्रवाशांचा ८ कोटींचा टप्पा पार केला आहे. दोन वर्षांच्या आत या मार्गिकेने ८ कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला असून, सद्यस्थिती दोन्ही मेट्रो मार्गिकेवर मिळून दरदिवशी सुमारे २ लाख ३५ हजार प्रवासी प्रवास करतात.
डहाणूकरवाडी ते आरे हा मेट्रोचा पहिला टप्पा २ एप्रिल २०२०ला सुरू झाला. त्यावेळी मेट्रो मार्गिकेला अंधेरी येथील मेट्रो १ मार्गिकेची जोडणी नसल्याने प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यातून पहिल्या आठ महिन्यांमध्ये या मेट्रो मार्गिकेवरून केवळ ८९ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता.
मात्र, या मेट्रो मार्गिकेचा दुसरा टप्पा २० जानेवारी २०२३ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. त्यानंतर प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या मेट्रो मार्गिकेवरून २० जानेवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ७ कोटी १७ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातून आतापर्यंत या मेट्रो मार्गिकांवरून ८ कोटी ७ लाख प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या (एमएमएमओसीएल) अधिकाऱ्यांनी दिली.
मेट्रो मार्ग उभारणीचा खर्च (कोटी रुपये) -
१) ‘मेट्रो २ अ’- ६,४१० कोटी रुपये
२) ‘मेट्रो ७’- ६,२०८ कोटी रुपये
> दरदिवशी सुमारे २.३५ लाख जणांचा प्रवास
> मेट्रो मार्गिकेवरून आतापर्यंत ८.०७ कोटी जणांचा प्रवास.
> २.३५ लाख दरदिवशीचे प्रवासी
> १.८५ लाख मेट्रो वन कार्ड खरेदी केलेले प्रवासी
> ९० हजार मेट्रो वन कार्ड वापरणारे प्रवासी
> ८ हजारमोबाईल ॲपद्वारे तिकीट काढणारे