मुंबई :मुंबईतील जास्त लोकसंख्येचा, घनतेचा विभाग असलेल्या के पूर्व विभागाच्या विभाजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवीन कार्यालयासाठी २२ नवीन पदे निर्माण करावी लागणार आहेत. वॉर्डाच्या विभाजनाची प्रक्रिया ६० ते ७० टक्के पूर्ण झाली असून, लवकरच प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २ नवीन वॉर्ड घोषित करण्यात येतील. यामुळे आता मुंबईतील वॉर्डांची एकूण संख्या २६ होणार आहे.
पालिका प्रशासनाकडून पी, के पूर्व आणि एल वॉर्डाच्या विभाजनाचा प्रस्ताव समोर आला होता. यापैकी पी वॉर्डाचे विभाजन झाल्यानंतर के पूर्व आणि एल वॉर्डाच्या विभाजनाचा प्रस्ताव पुढे आला आहे. यापैकी के पूर्व वॉर्डाचे के उत्तर आणि के दक्षिण अशा दोन भागांत विभाजन होणार आहे. एल वॉर्डाच्या विभाजनाच्या प्रस्तावावर समिती कार्यरत असून, लवकरच त्याचा अहवाल येईल.
एल वॉर्डाचे विभाजन प्रस्तावित:
एल वॉर्ड विभाजनाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर दुसरी समिती प्रस्ताव तयार करत आहे. १५.६ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या एल वॉर्डाची लोकसंख्या ९ लाख आहे. एल वॉर्डाचे एल उत्तर आणि एल दक्षिण अशा दोन भागात विभाजन होऊ शकणार आहे. नव्या वॉर्डाची इमारत चांदिवली येथे करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे चांदिवलीतील नागरिकांना प्रशासकीय कामासाठी कुर्ल्यात येण्याची गरज पडणार नाही.
छोटे वॉर्ड प्रशासकीय दृष्ट्या सोयीचे :
के पूर्व वॉर्डात जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, मरोळ आणि विलेपार्ले पूर्वचा समावेश होतो. के पूर्वमध्ये १५ नगरसेवक येतात, तर लोकसंख्या ८ लाख २३ हजारांहून अधिक आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने हा प्रभाग मोठा असल्याने पालिकेच्या प्रशासकीय कामकाजात अडचणी येत होत्या. त्यामुळे के पूर्व आणि एल वॉर्डांचे विभाजन करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने ठेवला आहे. छोटे वॉर्ड असल्याचे प्रशासकीय सोयीसाठी आणि कामासाठी त्याचा अधिक उपयोग होऊ शकतो, असे मत पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.