Join us

सुरक्षा उपाययोजनांमुळे घटली प्रवाशांच्या मृत्यूंची संख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 1:15 AM

पश्चिम रेल्वे प्रशासनाची माहिती : २०१९मध्ये ३६२ प्रवाशांच्या मृत्यूची नोंद

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर मागील वर्षीपेक्षा या वर्षी प्रवाशांच्या मृत्यूची संख्या कमी झाल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले. जानेवारी ते जून २०१८ दरम्यान ४१६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. याच कालावधीत २०१९ मध्ये ३६२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.स्थानकावरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ५२९ आणि रेल्वे सुरक्षा बलाचे ३५० जवान स्थानकांवर तैनात करण्यात आले आहेत. यामुळे जानेवारी ते जून २०१९ या कालावधीत २० प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश आले. जानेवारी ते जून २०१८ दरम्यान धावत्या लोकलमधून खांब लागून २६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. जानेवारी ते जून २०१९ दरम्यान ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने, लिफ्ट, पादचारी पूल, सुरक्षित भिंत यांची उभारणी केल्याने आणि सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याने प्रवाशांच्या मृत्यूची संख्या घटल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. दरम्यान, प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी पश्चिम रेल्वेद्वारे अनेक अभियान राबविले गेले आहेत. यामध्ये भारत्नरत्न सचिन तेंडुलकर, जॉन अब्राहम आणि जॅकी श्रॉफ यांच्याकडून प्रवाशांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी संदेश दिले आहेत.

या करण्यात आल्या उपाययोजनाज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल डेस्क सुरू करण्यात आला आहे.मागील १५ महिन्यांत एकूण २८ पादचारी पुलांची उभारणी केली आहे. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मागील पाच वर्षांत ६२ नवीन सेवा सुरू केल्या आहेत.

रेल्वे रुळाशेजारी असलेले अपघाती खांब हटविण्यात आले आहेत. जे खांब हटविणे शक्य नाही, ते खांब रात्रीच्या वेळेतही दिसावेत यासाठी त्यांना रेडियम लावण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर मागील २ वर्षांत ६.२८ किमी सुरक्षित भिंत आणि लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत.मागील ३ वर्षांत ३८ पादचारी पूल, ४२ सरकते जिने आणि २३ लिफ्टची सुविधा दिली आहे. यासह ३६ पादचारी पूल, ७२ सरकते जिने आणि ४० लिफ्ट उभारण्यात येणार आहेत.लोकल आणि फलाट यामधील गॅप कमी करण्यासाठी १६८ फलाटांची उंची वाढविली आहे.

रेल्वे फाटक बंदमुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस स्थानकावर ४ बायोमेट्रिक क्यू मॅनेजमेंट डिवाइस लावले आहेत. जोगेश्वरी स्थानकावर होणारे अपघात कमी करण्यासाठी रेल्वे फाटक पूर्णत: बंद केले आहे. पूर्व-पश्चिम प्रवास करण्यासाठी नवीन पुलाची उभारणी केली आहे. या ठिकाणी मागील वर्षी ३० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मात्र या वर्षी शून्य मृत्यू झाला आहे.

टॅग्स :पश्चिम रेल्वे