मुंबई : ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात नियंत्रणात आलेल्या राज्यातील कोरोना प्रादुर्भावाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. १ ते ५ सप्टेंबर या कालावधीत राज्यात तब्बल ९१ हजार १० रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात शनिवारी पुन्हा एकदा २० हजार ४८९ रुग्ण निदानाची नोंद झाली असून, ही आतापर्यतची सर्वाधिक वाढ आहे. तर दिवसभरात ३१२ मृत्यू झाले असून, एकूण बळींची संख्या २७ हजार २७६ झाली आहे.
सध्या २ लाख २० हजार ६६१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०१ टक्के झाले असून, मृत्युदर २.९७ टक्के आहे. त्याखालोखाल ठाण्यात २३ हजार तर मुंबईत २२ हजार सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत दिवसभरात १ हजार ७३७ रुग्ण आढळले असून, ३३ मृत्यू झाले आहेत.
३३ हजारांहून अधिक बालकांना संसर्ग
मागील काही दिवसांत पुन्हा एकदा राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या तब्बल ३३ हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या ही रुग्णसंख्या ३३ हजार ८४३ असून, एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ४.०० टक्के एवढे आहे. तर ११ ते २० वयोगटातील प्रौढ रुग्णांची संख्या ६० हजार ५६६ असून, एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ७.१६ टक्के इतके आहे.