मुंबई - देश आणि राज्यावर आलेले कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्याची चिन्हे असतानाच आता राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी, वाढत्या कोरोनामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच, कोरोनापासून बचावासाठी शिस्त पाळणं बंधनकारक असून आता आपण आणखी एक मोहिम राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितंलं. त्यावरुन, मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे.
मनसचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी राज्य सरकारच्या नवीन मोहिमेवरुन महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. कोरोना युद्धात विजय मिळाला तर त्याचं श्रेय फेसबुकीय मुख्यमंत्र्यांना! आणि पराभव झाला- पुन्हा रुग्णसंख्या वाढली- की त्याची जबाबदारी जनतेवर! बेजबाबदार सरकारला पाठीशी घालणाऱ्या 'मी जबाबदार' या शिवसेना पुरस्कृत कॅम्पेनचा निषेध, असे ट्विट किर्तीकुमार शिंदे यांनी केलंय. आपल्या ट्विटसोबत अभिनेता सुशांत शेलारने बदलल्या प्रोफाईल फोटोचं छायाचित्रही त्यांनी शेअर केलंय.
मी जबाबदार
माझे कुटुंब माझे जबाबदारी ही मोहीम आपण यशस्वी केली, त्यानंतर आता आणखी एक मोहीम आपण राबवली पाहिजे. होय, मीच जबाबदार... प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागणं म्हणजेच होय मीच जबाबदार. आपली जी बंधने आहेत, घराबाहेर पडताना मास्क, हाताला सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर हे पाळालयाच हवं. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मी एक सूचना केली. आपल्याकडे 24 तास असतात, या 24 तासांची नीट विभागणी केल्यास नियंत्रण ठेवता येईल. वर्क फ्रॉम होमद्वारेही आपण कामाची विभागणी करु शकतो. हीच आपली नवीन मोहिम आहे, जी आपली जबाबदारी आहे, होय मीच जबाबदार... असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या नवीन मोहिमेवरुन त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. किर्तीकुमार शिंदे यांनीही याच मुद्द्यावरुन सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.
राम कदम यांची टीका
'मी जबाबदार' मोहीम म्हणजे स्वतः जबाबदारी घेण्याऐवजी जनतेवर जवाबदारी थोपवायची, राज्य सरकारचं असं वागणं गेले वर्षभर सुरू आहे, सरकार म्हणून कधी जवाबदारी घेणार आहांत. हजारोंच्या गर्दी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना लगेच परवानगी दिली जाते, बियर बार सुरू राहिलेले आवडतात, पण मंदिरं सुरु राहिलेली आवडत नाहीत सरकारला ! धन्य आहे ?, असे म्हणत राम कदम यांनी सरकारच्या नव्या मोहिमेवरुन टीका केलीय.