मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख चढता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:09 AM2021-09-05T04:09:03+5:302021-09-05T04:09:03+5:30
मुंबई : मुंबईत शनिवारी ४१६ रुग्ण आणि चारजणांच्या मृत्यूची नोंद झाली. शहर उपनगरात सलग चौथ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या चारशेहून ...
मुंबई : मुंबईत शनिवारी ४१६ रुग्ण आणि चारजणांच्या मृत्यूची नोंद झाली. शहर उपनगरात सलग चौथ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या चारशेहून अधिक असल्याचे दिसून आले आहे. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोविड संसर्गाचा धोका वाढता असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
१६ ऑगस्टला सर्वांत कमी १९० रुग्णांची नोंद झाली. मात्र, गेल्या काही दिवसांत पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होऊन दिवसाला ३०० रुग्ण आढळून येत होते. ३१ ऑगस्टला ३२३ रुग्ण आढळले होते. सप्टेंबर महिन्यात त्यात वाढ होऊन १ सप्टेंबरला ४१६, २ सप्टेंबरला ४४१, ३ सप्टेंबर ४२२ रुग्ण आढळले आहेत. शहर उपनगरात बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे, तर १८ ऑगस्टला २ हजार ५८ दिवस होता. ६७७ दिवसांनी घसरून शनिवारी १ हजार ३७९ दिवसांवर आला आहे.
शहर उपनगरात ३८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, ७ लाख २३ हजार ८४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या ७ लाख ४५ हजार ८५० आहे, तर मृतांचा आकडा १५ हजार ९९१ इतका आहे. दिवसभरात ३६ हजार ५४६ चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण ९३ लाख ८९ हजार ८४२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
२८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०५ टक्के आहे. शहर उपनगरात झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ४६ आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील २ हजार ९३१ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.