coronavirus News: राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला तीन लाखांचा टप्पा; मुंबईतील बाधितही लाखांच्या पार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 01:39 AM2020-07-19T01:39:48+5:302020-07-19T06:09:00+5:30
राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात आढळला होता. त्यानंतर कोरोनावर उपाययोजना करीत राज्य शासन व पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र तरीही चार महिन्यांनंतरही कोरोनावर मात करण्याची लढाई सुरू आहे. राज्यात शनिवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने तीन लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे, तर मुंबईतही एक लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली.
राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात ८ हजार ३४८ बाधितांची नोंद झाली असून १४४ मृत्यू झाले आहेत. राज्यात एकूण रुग्णसंख्या ३ लाख ९३७ असून मृतांचा आकडा ११ हजार ५९६ झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.०५ टक्के झाले असून मृत्युदर ३.८५ टक्के आहे.
राज्यात शनिवारी नोंद झालेल्या १४४ मृत्यूंमध्ये मुंबई ६५ , ठाणे १, नवी मुंबई मनपा १, कल्याण-डोंबिवली मनपा ६, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा ३, वसई- विरार मनपा ८, रायगड १, नाशिक २, नाशिक मनपा २, धुळे मनपा १, जळगाव १, पुणे ९, पुणे मनपा १६, पिंपरी-चिंचवड मनपा ७ आदी रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ५ हजार ३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १ लाख ६५ हजार ६६३ जण कोविडमुक्त झाले आहेत.
मुंबईच्या तुलनेत सक्रिय; रुग्णांमध्ये ठाणे, पुणे आघाडीवर
मुंबईत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २३,९१७ आहे. मुंबईच्या तुलनेत सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत ठाणे, पुणे जिल्हा आघाडीवर आहे. ठाणे जिल्ह्यात ३७,२९५, तर पुण्यात ३१,३८० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मुंबईत ४ लाख २७ हजार ३७८ चाचण्या झाल्या असून शहर-उपनगरात १५,९९० लक्षणविरहित रुग्ण आहेत.