Join us

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांची गर्दी वाढली; एअर इंडियाने अमेरिकेच्या फेऱ्या केल्या दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:06 AM

मुंबई : परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागल्यामुळे एअर इंडियाने अमेरिकेला जाणाऱ्या विमानफेऱ्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुंबई : परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागल्यामुळे एअर इंडियाने अमेरिकेला जाणाऱ्या विमानफेऱ्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ऑगस्टपासून देशभरातील विमानतळांवरून वाढीव फेऱ्या (थेट सेवा) उड्डाण करतील.

अमेरिकी विद्यापीठांत शिक्षणासाठी येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना १ ऑगस्टपासून प्रवेश देण्याचा निर्णय अमेरिकेने नुकताच जाहीर केला. एफ१ किंवा एम१ व्हिसाधारक विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ग सुरू होण्याच्या ३० दिवस आधी अमेरिकेत येण्याची मुभा मिळाल्याने देशभरातील विमानतळांवर अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. ही संधी साधत एअर इंडियाने अमेरिकेच्या फेऱ्या वाढविल्या आहेत.

एप्रिलपर्यंत भारतातून अमेरिकेसाठी आठवड्याला ४० विमाने उड्डाण करायची. मात्र, दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अमेरिकेने ४ मेपासून भारतीय प्रवाशांवर निर्बंध लागू केल्याने ही संख्या दहाच्याही खाली आली. अद्याप भारतीयांवरील प्रवासबंदी पूर्णतः शिथिल झाली नसली तरी विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता दर आठवड्याला २१ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यूयॉर्क, शिकागो आणि सॅन फ्रॅन्सिस्को विमानतळांसाठी हे विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.