ट्विटरवरून वैद्यकीय मदत मागणाऱ्यांची संख्या २० पटींनी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:05 AM2021-07-05T04:05:47+5:302021-07-05T04:05:47+5:30
मुंबई : ट्विटर हे केवळ समाजमाध्यम म्हणून मर्यादित न राहता कोरोना काळात रिअल टाईम हेल्पलाईन म्हणून नावारूपास आले आहे. ...
मुंबई : ट्विटर हे केवळ समाजमाध्यम म्हणून मर्यादित न राहता कोरोना काळात रिअल टाईम हेल्पलाईन म्हणून नावारूपास आले आहे. कारण गेल्या दीड वर्षात ट्विटरवरून वैद्यकीय मदत मागण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तूलनेत दुसऱ्या लाटेत तर त्यात जवळपास २० पटींनी वाढ झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली घटना तत्काळ पोहोचवणारा जलद दुवा म्हणून ट्विटर ओळखले जाते. या वेगाचा उपयोग करत ट्विटरने कोरोना रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एका संशोधन अहवालानुसार, वैद्यकीय मदत मागणे किंवा देण्यासंदर्भात करण्यात आलेल्या ट्विट्समध्ये १९५८ टक्क्यांनी (२० पट) वाढ झाली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान कोविडशी संबंधित ७७ टक्के अधिक ट्विट करण्यात आले. १ एप्रिल ते ३१ मे २०२१ या काळात रक्ताच्या मागणीबाबत ७२ टक्के आणि प्लाझ्माशी संबंधित ट्विटमध्ये ८३४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
ट्विटरच्या संशोधन समितीने कोरोना काळात करण्यात आलेल्या ट्विटचे विश्लेषण आणि तुलनात्मक अभ्यास केला. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत वैद्यकीय मदतीसाठी ट्विट करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती, हे अभ्यासाअंती समोर आले. कोविड संदर्भातील ट्विटला उत्तर देणाऱ्यांची संख्याही १.५ पटीने वाढल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
जेवणापासून औषधांपर्यंत
- लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने हातावर पोट असलेल्यांचे हाल झाले. अनेक उच्चशिक्षित नोकरदारही बेरोजगार झाले. अशावेळी घरातील उत्पन्नाचा स्रोत बंद झाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली.
- अशा अनेक व्यक्तींनी ट्विटरचा आसरा घेत धान्य किंवा अन्य गरजेच्या वस्तूंसाठी मदतीचे आवाहन केले. त्यातील बहुतांश गरजूंना तत्काळ मदत मिळाली.
- शिवाय औषधे, आरोग्य सुविधा, रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्याची मागणीही ट्विटरद्वारे करण्यात आली.
- लसीकरण, मानसिक आरोग्य, कोरोनाशी मुकाबला करण्याचे बळ देणारे ट्विटही या काळात करण्यात आले.
'ते' ट्विट ठरले सर्वात लोकप्रिय
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला. यातून सावरण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्स याने भारताला आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा ट्विटरद्वारे केली. हे सर्वाधिक लाईक मिळवणारे आणि रिट्विटेड ट्विट ठरले.