मुंबईतून कल्याण, विरारला सुटणाऱ्या एसटींची संख्या वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:07 AM2021-01-03T04:07:57+5:302021-01-03T04:07:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काेराेना संकटामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांसाठी रेल्वे वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अनेक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेना संकटामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांसाठी रेल्वे वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अनेक जण एसटी प्रवासावर अवलंबून आहेत. या प्रवाशांच्या साेयीसाठी आता राज्यभरातून ७० ते ७५ चालकांसह वाहक मुंबईत आले असून एसटीच्या मुंबईतून कल्याण, विरारला सुटणाऱ्या बसेसची संख्या वाढणार आहे.
वाहतूक नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्याने सांगितले की, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून कल्याण, विरारला जाण्यासाठी १५ बस सुटतात. परंतु त्या प्रवाशांच्या तुलनेत कमी असून आणखी १० ते १५ एसटी बसची आवश्यकता आहे. बस उपलब्ध आहेत पण चालक, वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे बस जास्त सोडण्यास अडचणी येतात. जास्त बस सोडल्या तर एसटीला चांगले उपन्न मिळेल, पण कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे बस सोडता येत नव्हत्या. मात्र आता राज्यातील विविध आगारांतून काही कर्मचारी आले आहेत. त्यामुळे बसची संख्या वाढेल.
अन्य एका कर्मचाऱ्याने सांगितले की, ७० ते ७५ कर्मचारी मुंबईत येणार आहेत. या कर्मचाऱ्यांमुळे जास्त बस सुटतील. प्रवाशांची गर्दी कमी होईल. तसेच मुंबईतील तिन्ही आगारांना मिळून (कुर्ला, मुंबई सेंट्रल नेन्सी-बाेरीवली) महिन्याला दीड कोटींची उत्पन्न मिळेल.
* इतर आगारांतील कर्मचारी उपलब्ध
मुंबई, ठाणे, पालघरला गाड्यांची मागणी जास्त आहे. त्यामुळे या आगारांसाठी राज्यातील इतर आगारांतील कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.
- शेखर चन्ने,
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ