संचमान्यतेत विद्यार्थी संख्या २० करणार - विनोद तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 05:23 AM2017-12-29T05:23:58+5:302017-12-29T05:24:07+5:30
मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयातील सायन्स प्रॅक्टिकलसाठी संचमान्यतेमध्ये आवश्यक ४० विद्यार्थ्यांची संख्या २० करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना दिले आहे.
मुंबई : मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयातील सायन्स प्रॅक्टिकलसाठी संचमान्यतेमध्ये आवश्यक ४० विद्यार्थ्यांची संख्या २० करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना दिले आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषदेने गुरुवारी घेतलेल्या भेटीदरम्यान तावडे यांनी शिक्षकांना हा दिलासा दिला आहे.
शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे व सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र पाठक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील विविध महाविद्यालयांतील शिक्षकांनी गुरुवारी तावडे यांची भेट घेतली. त्यानंतर बोरनारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संचमान्यतेत सायन्स प्रॅक्टिकल व गणित विषय टुटोरियल्सच्या बॅचची विद्यार्थीसंख्या ४०ऐवजी २० केल्यामुळे विज्ञान व गणित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय शिक्षकांच्या विविध मागण्या शिक्षणमंत्र्यांनी मान्य केल्या आहेत. त्यात राज्य व विभागीय शिक्षण मंडळ सदस्यांच्या नेमणुका जाहीर करणे, कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना १ एप्रिलपासून कॅशलेस मेडिकल सुरू करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. बैठकीत दुबार शिक्षकांचा सहानुभूतिपूर्वक विचार करण्याचेही तावडे यांनी मान्य केले आहे; शिवाय १ नोव्हेंबर २००५ सालानंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत चर्चा करण्याचेही त्यांनी आश्वासित केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या सेवाशर्तीबाबत जानेवारीमध्ये तातडीने अधिकाºयांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासनही तावडे यांनी दिल्याचे बोरनारे यांनी सांगितले.