भायखळा विषबाधेचा आकडा ९४वर; ८४ कैद्यांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 05:41 AM2018-07-22T05:41:47+5:302018-07-22T05:42:34+5:30
भायखळा कारागृहातील आणखी पाच पुरुष कैदी आणि तीन महिलांनाही उलटी, अतिसार, मळमळ असा त्रास जाणवू लागल्याने शनिवारी रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल केले.
मुंबई : भायखळा कारागृहातील आणखी पाच पुरुष कैदी आणि तीन महिलांनाही उलटी, अतिसार, मळमळ असा त्रास जाणवू लागल्याने शनिवारी रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे विषबाधेचा आकडा ९४वर गेला आहे.
रुग्णालयातील ८७ पैकी ७९ महिला कैद्यांना शनिवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला होता. यात चार महिन्यांचे बाळही आहे, अशी माहिती सर जे.जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी दिली. त्यानंतर पुन्हा आठ कैदी दाखल झाले. यातील ५ जणांना उपचारानंतर रात्री उशिरा डिस्चार्ज दिला. त्यामुळे आता फक्त ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विलास कुरुडे म्हणाले, सात महिला कैदी रुग्णांपैकी तीन २२ ते २६ आठवड्यांच्या गरोदर आहेत. एका महिलेला अॅनिमियाचे निदान झाले आहे.
दरम्यान, आमदार मनीषा कायंदे, नगरसेविका किशोरी पेडणेकर, आ. भरतशेठ गोगावले यांनी रुग्णांची भेट घेतली. कायंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली.