Join us  

मासळी दुष्काळामुळे असंख्य बोटी किनारी

By admin | Published: April 24, 2015 4:02 AM

दरवर्षी साधारण मे महिन्याच्या अखेरीस मासेमारी बोटी मुरुड किनाऱ्याला लागतात. परंतु यंदा एप्रिल महिन्यातच बोटी किनाऱ्याला लागल्या आहेत.

नांदगाव : दरवर्षी साधारण मे महिन्याच्या अखेरीस मासेमारी बोटी मुरुड किनाऱ्याला लागतात. परंतु यंदा एप्रिल महिन्यातच बोटी किनाऱ्याला लागल्या आहेत. खोलवर समुद्रात जावूनही मासळी मिळत नसल्याने मच्छीमारांनी बोटी किनारी आणल्या आहेत. मासेमारीसाठी खोलवर जावे लागत लागते. यासाठी प्रत्येक मोठ्या बोटींना किमान ३० ते ४० हजारांच्यावर आठवड्यास डिझेल खर्च करावा लागतो. शिवाय बोटीवर किमान सात व्यक्तींना भोजन खर्च होतो. आठवडा-दोन आठवडे खोल समुद्रात राहूनही मासळीच मिळत नसल्याने हताश होवून मुरुड, एकदरा व अन्य भागातील शेकडो होड्या किनाऱ्यावर लागल्या आहेत.खर्च अधिक परंतु उत्पन्न तुटपुंजे मिळत असल्याने सर्व कोळी बांधव नाराज झाले आहेत. त्यामुळे प्रचंड खर्च व कर्जाचा डोंगर वाढण्याअगोदरच होड्या किनाऱ्याला आणून पावसाळ्यानंतरच मच्छीमारीसाठी जाणार आहेत. खोल समुद्रात आता परप्रांतीय आक्रमण वाढल्यामुळेही मासळी दुष्काळ जाणवत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)