मुंबई - दहिसर पश्चिम येथील सखाराम तरे मार्ग महापालिका शाळेच्या नवीन इमारतीचे दि,१५ जून रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते घाईघाईत उद्घाटन करण्यात आले. परंतू उद्घाटन केल्यानंतर १ महिना उलटूनही नविन इमारतीमध्ये आजही असंख्य असुविधा आहेत. सदर इमारतीत असंख्य असुविधा असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या इमारतीमधील लीफ्ट नादुरुस्त असून अनेक ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे.तसेच शौचलायांची देखिल दयनीय अवस्था आहे.अग्निरोधक यंत्रणेबाबतही अनेक त्रुटी असून विद्यार्थ्यांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची देखील सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही.
सध्या वर्ग मोडकळीस आलेल्या धोकादायक जुन्या इमारतीतील लहान खोल्यांमध्ये भरवले जातात.विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसवले जात असून काही वेळा शिक्षणासाठी त्यांना एक दिवस आड बोलवले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना वर्गात जमिनीवर बसून शिकवले जातात. त्यामुळे लेखी कोणत्याही पद्धतीचे शिक्षण दिले जात नाही. तसेच इयत्ता ८ वी व ९ वी मध्ये २७० विद्यार्थी असूनही शिकविण्यासाठी फक्त ३ शिक्षक आहेत!
सदर असुविधांबाबत शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) विधानपरिषद आमदार विलास पोतनीस व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी आज तात्काळ शाळेला भेट देऊन पाहणी केली व शाळेतील नवीन इमारतीतील असुविधा तात्काळ दूर करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी अन्यथा शिवसेना उग्र आंदोलन करेल असा इशारा दिला. याप्रसंगी मुख्याध्यापिका निरंजना छोवाला,प्रशासकीय अधिकारी (शाळा)पंकज पिंपळे, शाखाप्रमुख अक्षय राऊत, शाखा संघटक दिपा चुरी, उपविभागसंघटक शर्मीला पाटील, मनोहर पाटील, सनी पाटील उपस्थित होते.