नूर मंजिलचे रहिवासी वाऱ्यावर
By admin | Published: February 9, 2015 02:00 AM2015-02-09T02:00:10+5:302015-02-09T02:00:10+5:30
भायखळा पश्चिमेकडील नूर मंजिलला शुक्रवारी भीषण आग लागल्याने येथील २५ कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
मुंबई : भायखळा पश्चिमेकडील नूर मंजिलला शुक्रवारी भीषण आग लागल्याने येथील २५ कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. मात्र दुर्घटनेला ४० तास उलटले असूनही पीडित रहिवाशांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसून रहिवासी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.
शुक्रवारी घटना घडल्यानंतर रविवारपर्यंत रहिवाशांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नव्हती. शेजारीच असलेल्या सकीना मंजिलमधील रहिवाशांनी पीडित कुटुंबांना इमारतीच्या गच्चीवर तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला आहे. तर इमारतीमधील नागरिकांच्या घरांतून पीडित कुटुंबांना दोनवेळचे जेवण दिले जात आहे. स्थानिक आमदार वारिस पठाण यांनी जवळच असलेल्या पठाण चाळीतील संक्रमण शिबिरात १२ कुटुंबांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याचे सलीम कुरेशी यांनी सांगितले. मात्र त्या संक्रमण शिबिरांतील घरांमध्ये वीज आणि पाण्याची बोंब आहे. शिवाय येथील दरवाजे व खिडक्याही चोरीस गेल्या आहेत. आकाराने खूपच लहान असलेल्या तेथे राहायचे तरी कसे, असा सवाल कुरेशी यांनी केला.
पुनर्वसनासाठी रहिवाशांना धारावी येथे धाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र रहिवाशांचा धारावीला जाण्यास ठाम विरोध आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या शालेय परीक्षा जवळ आल्या आहेत. धारावीहून आग्रीपाडा आणि भायखळा परिसरातील शाळा गाठायच्या तरी कशा, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. त्यामुळे घोडपदेव संक्रमण शिबिरांत पुनर्वसन करण्याची त्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)