नर्सला ‘म्हाडा’चे घर लागले, ११ वर्षांनी लागला शोध; कागदपत्रांचा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 12:47 PM2023-11-02T12:47:27+5:302023-11-02T12:47:46+5:30
दहिसरमधील एका नर्सला ११ वर्षांपूर्वी ‘म्हाडा’ची लॉटरी लागली; पण जातपडताळणी प्रमाणपत्राअभावी तिची फाइल बंद करण्यात आल्याचे तिला एजंटने सांगितले.
मुंबई :
दहिसरमधील एका नर्सला ११ वर्षांपूर्वी ‘म्हाडा’ची लॉटरी लागली; पण जातपडताळणी प्रमाणपत्राअभावी तिची फाइल बंद करण्यात आल्याचे तिला एजंटने सांगितले. तर दुसरीकडे त्याच कागदपत्रांचा वापर करीत तिच्या सह्या, अंगठे घेत त्याने तिचे घर लाटले. हा प्रकार समजल्यानंतर याविरोधात तिने दहिसर पोलिसांत धाव घेत सुनील जंगापल्ले (वय ५६) यांच्याविरोधात तक्रार केली असून, गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार मीनाक्षी जाधव-सावंत (४२) या खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत असून गेले सहा महिने विरारमध्ये पती आणि मुलासह भाडेतत्त्वावर राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये फेब्रुवारी-२००९ मध्ये ‘म्हाडा’ने काढलेल्या सदनिका वितरण लॉटरीसाठी त्यांनी लग्नापूर्वी जाधव या नावाने एसटी या प्रवर्गातून अर्ज केला होता. त्यानंतर मे- २००९ मध्ये त्यांना लॉटरी लागली. जातप्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्या बोरिवली तहसीलदार कार्यालयात गेल्या. तिथे त्यांची ओळख आरोपी सुनीलसोबत झाली. त्याने जातप्रमाणपत्र मिळविण्यासाठी मदत करण्याचे सांगत फसविले.
‘म्हाडा’त ओळख असल्याने काही होतंय का बघा, असे जाधव यांनी सुनीलला सांगत स्वतःची फाइल त्यांना दिली. पुढे २०१४ मध्ये तक्रारदाराचे लग्न झाले आणि त्यांनी पाठपुरवठा करणे बंद केले. दरम्यान, २०१४ मध्ये जातपडताळणी प्रमाणपत्र न आल्याने तक्रारदाराच्या आई-वडिलांनी ठाणे कार्यालयात चौकशी केल्यावर सुनीलने ते प्रमाणपत्र नेल्याचे त्यांना समजले.
सातव्या मजल्यावर तुमचा फ्लॅट आहे!
काही कामासाठी तक्रारदाराने सुनीलला फोन केल्यावर त्याने दहिसरच्या शैलेंद्रनगरकडे त्यांना बोलावले. तेव्हा सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षाकडून सातव्या मजल्यावर त्यांच्या नावाचा फ्लॅट आहे, ही माहिती जाधव यांना मिळाली. त्या ठिकाणी सुनीलने ११ वर्षे भाडेतत्त्वावर जाधवचे नातेवाईक असल्याचे सांगत वेगवेगळ्या लोकांना ठेवले आणि आर्थिक फायदा घेतला.
सोसायटीकडून पाणी, लाइट बंद!
सुनीलने सोसायटीकडे कोणतीही कागदपत्रे हजर न केल्याने त्यांनी फ्लॅटचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला. तेव्हा त्याने जाधव यांना सदर सोसायटीमध्ये बोलावले आणि हा प्रकार उघडकीस आला. जाब विचारल्यावर ३५ लाख द्या आणि खोली घ्या, असे त्याने सांगितले.