रुग्णाला उंदीर चावल्याच्या प्रकरणात परिचारिकेची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:06 AM2021-07-10T04:06:25+5:302021-07-10T04:06:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात गेल्या महिन्यात एका रुग्णाला उंदीर चावल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रुग्णालयात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात गेल्या महिन्यात एका रुग्णाला उंदीर चावल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रुग्णालयात रात्रपाळीत काम करणाऱ्या परिचारिकेची विभागांतर्गत चौकशी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली आहे; मात्र या रुग्णाचा मृत्यू उंदीर चावल्यामुळे झालेला नाही, असेही या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.
मेंदूज्वर आणि यकृताचा आजार असलेल्या कुर्ला येथील श्रीनिवास येल्लपा (२४) या तरुणाची प्रकृती बिघडल्यामुळे २० जून रोजी त्याला राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या श्रीनिवासच्या डोळ्याच्या दोन बाजूस जखमा झाल्याचे त्याच्या नातेवाईकांना २२ जूनला लक्षात आले. प्राथमिक पाहणीत उंदीर चावल्यामुळेच या जखमा झाल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली होती. दुसऱ्याच दिवशी या रुग्णाचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी नियुक्त समितीने आपला अहवाल प्रशासनाला सादर केला आहे.
अहवालानुसार या रुग्णाला झालेल्या जखमा उंदीर चावल्यामुळे असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले आहे. याप्रकरणी रात्रपाळीमध्ये कार्यरत असलेल्या परिचारिकेची चौकशी करण्याचे समितीने सूचित केले आहे. तसेच रात्रपाळीत काम करणाऱ्या डॉक्टरांनाही यापुढे सतर्कता बाळगण्याच्या सूचना करण्यात आली आहे. त्या परिसरात स्वच्छता ठेवण्याचे आदेशही संबंधित विभागांना दिले आहेत.
अडगळ नकोच
अतिदक्षता विभागात समोरील जागेत अडगळीचे सामान पडलेले असे. तेदेखील हलवून स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णालयाच्या परिसरात मूषक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यास प्रशासनाने सांगितले आहे. या घटनेनंतर त्या विभागात असलेल्या अडगळीचे सामान अन्य ठिकाणी हलवून स्वच्छता करण्यात आली आहे.
रुग्णाचा मृत्यू उंदीर चावल्यामुळे नाही
या रुग्णाच्या डोळ्याला वरचेवर काही जखमा झाल्या होत्या, परंतु डोळ्याला इजा झालेली नव्हती. तसेच हा रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर होता व त्याची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे या रुग्णाचा मृत्यू उंदीर चावल्यामुळे झालेला नाही, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.