Join us

रात्रशाळेत अभ्यास करून आई, आजी दहावीत ठरल्या सरस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 4:26 AM

काळाचौकीतील मायलेकीने एका शाळेतून परीक्षा देऊन त्यात माय अव्वल ठरली. तर आजींनीही परीक्षा देत यश मिळवले.

- सीमा महांगडे मुंबई : दहावीचा निकाल नुकताच लागला. यात अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले मात्र, काळाचौकीतील मायलेकीने एका शाळेतून परीक्षा देऊन त्यात माय अव्वल ठरली. तर आजींनीही परीक्षा देत यश मिळवले.काळाचौकीत अनुश्री, तिची आई कविता आंबेरकर (कदम) राहतात. कविता यांनी रात्रशाळेतून अभ्यास करून ६० टक्के गुण मिळवले. मुलगी अनुश्रीपेक्षा २ टक्के गुण त्यांना जास्त मिळाले आहेत. घरी तीन मुलं आणि एकत्रित कुटुंब असणाऱ्या कविता यांची लग्नाआधीच शाळा सुटली. मात्र शिक्षण घेण्याची इच्छा कायम होती. मुलगी दहावीला आल्यानंतर तिच्यासोबतच आपणही दहावी देऊ अशा विचाराने त्यांनी अहिल्या नाइट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. घरकाम आणि मुलांचा सांभाळ करत त्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यांनी ६० टक्के गुण मिळविले. पुढेही शिक्षण घ्यायची त्यांची इच्छा आहे.काळाचौकीतल्याच कमल काशिनाथ शिंदे-पवार या ६० वर्षांच्या आजींनी दहावीच्या परीक्षेत ५० टक्के गुण मिळवले आहेत. या वयात अनेक वृद्ध व्यक्ती पोथी आणि पुराण वाचताना दिसतात. मात्र त्यांनी शिकून चांगले गुण मिळवले. लहानपणापासून कमल यांना शिक्षणाची आवड होती; परंतु वडिलांची मिल बंद पडल्याने त्यांना ७वीतच शिक्षण सोडावे लागले. घरोघरी जाऊन धुणीभांडीची काम त्या करू लागल्या. हे सर्व सुरू असतानाच त्यांचे लग्न झाले. त्यानंतर मूलबाळ, संसार यात त्या रमल्या. परंतु मनात शिक्षणाची ओढ कायम होती. कमल आजींची दोन्हीही मुले उच्चशिक्षित. अडीच वर्षांची नातही आहे.मुले आपापल्या वाटेने यशस्वी झाल्यानंतर कमल यांनी शिक्षणाला नव्याने सुरुवात केली. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी ८ वीला प्रवेश घेतला आणि ६० व्या वर्षी अहिल्याबाई नाइट हायस्कूलमधून दहावीचा फॉर्म भरला. घरकाम, स्वत:चा कॅटरिंगचा व्यवसाय चालवत केवळ रोजचा दोन तास रात्रशाळेतील अभ्यास यावरच त्यांनी दहावीची तयारी केली. आपल्या या यशाचे श्रेय त्या शिक्षकांना, कुटुंबीयांना आणि स्वत:च्या मेहनतीला देतात. शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते हे आपल्या कृतीतून दोघींनी सिद्ध केले आहे.

टॅग्स :दहावीचा निकाल