Join us

तान्ह्या बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावणारी ‘ती’ परिचारिका निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 8:41 AM

सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात बेपर्वाई भोवली; दुसरीला इशारा पत्र

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात नवजात बालकांचा अमानुष छळ होत असल्याचा प्रकार लोकमतमधून उघडकीस आल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या रुग्णालय प्रशासनाने बेपर्वाई करणाऱ्या परिचारिका सविता भोईर यांना निलंबित करण्यात आले असून, दुसऱ्या परिचारिका ऋतुजा रेवाळे यांना इशारा पत्र दिले आहे.

या प्रसूतिगृहातील आयसीयू विभाग डॉ. अतिष लड्डा यांच्या संस्थेला चालविण्यास देण्यात आला आहे. बदलापूर येथे राहणाऱ्या प्रिया कांबळे यांच्या एनआयसीयूमध्ये ठेवलेल्या तान्ह्या बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याचे दिसून आल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. याबाबत समिती स्थापन करून चौकशीचा निर्णय घेतला असून तसे पत्र वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवण्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

संस्थेला नोटीस

प्रसूतिगृहाच्या डीन डॉ. चंद्रकला कदम यांची नुकतीच या रुग्णालयात बदली झाली असून, त्यांनी परिचारिकांवर कारवाई केल्याची माहिती दिली. एनआयसीयू चालवण्यास देणाऱ्या संस्थेला नोटीस पाठवण्याचे त्यांनी सांगितले.

बाळाच्या हातावर सुयांच्या खुणा

बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याचे उघड होताच प्रिया कांबळे यांनी तत्काळ डिस्चार्ज घेत बाळाला ठाण्यातील रुग्णालयात हलवले. तेथे उपचारानंतर बाळ ठणठणीत आहे. मात्र सावित्रीबाई फुले रुग्णालयातील शिकाऊ परिचारिकांनी सलाईन लावण्यासाठी बाळाच्या हाताला अनेकदा सुया टोचल्यामुळे तेथे अजूनही खुणा असल्याचे प्रिया यांनी सांगितले.

पालिकेवर आरोप करत भाजपचा आज मोर्चा 

पालिका प्रशासनाकडून लड्डा यांना पाठीशी घालत आहे. त्यांच्या संस्थेचे नाव काय, संस्थेला कंत्राट कधी देण्यात आले, त्याची माहिती दडवली जात असून या बेजबाबदार संस्थेवर बुधवारी सकाळी भाजप मोर्चा काढणार आहे. याबाबत डॉ. लड्डा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलीस ठाण्यात असल्याचे सांगत बोलण्याचे टाळल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

 

टॅग्स :मुंबई