नर्सरी प्रवेश निश्चितीस पालकांना ‘टोकन’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 03:39 AM2018-12-18T03:39:39+5:302018-12-18T03:40:14+5:30
प्रक्रियेत सुसूत्रता नसल्याचा फटका : प्रवेशासाठी पालकांच्या धावपळीचा शाळा व्यवस्थापनाकडून गैरवापर
मुंबई : मुलांनी वयाची तीन वर्षे पूर्ण करताच, त्याच्या शाळा प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरू होते. मात्र, नर्सरी प्रवेशाबाबत राज्य सरकारचे ठोस धोरण नाही. या प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता नसल्यामुळे पालकांकडून प्रवेश अर्जाच्या नावाखाली २०० ते १ हजार रुपयांपर्यंत मनमानी शुल्क आकारले जात आहे. रात्रभर जागून अर्ज मिळविण्यासाठी त्यांना रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी तर अर्जासाठी टोकन दिले जात आहे. मात्र, ते मिळविण्यासाठीही भल्या मोठ्या रांगेत तिष्ठत उभे राहण्याची वेळ पालकांवर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबईतील अनेक शाळांमध्ये सध्या नर्सरी प्रवेशाचे बिगुल वाजले आहे. काही शाळांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. काहींनी डिसेंबर तर काहींनी जानेवारीच्या दुसºया आणि शेवटच्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात या वर्गांचे प्रवेश शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी एक महिन्याच्या काळात करावेत, असा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेला असतानाही खासगी शाळांकडून त्याचे पालन होताना दिसत नाही.
मुंबईतील ग्लोरिया गर्ल्स हायस्कूलने ज्युनिअर केजीच्या प्रवेशासाठी १९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान अर्ज दिले. मात्र, ते मिळविण्यासाठी पालकांना भल्यामोठ्या रांगेत उभे राहून टोकन घ्यावे लागले. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी असल्याची माहिती मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी दिली. या संदर्भात त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि उपसंचालक कार्यालय, प्राथमिक संचालनालयाला पत्र लिहिले आहे. अशा शाळांवर योग्य कार्यवाही करून पूर्व प्राथमिक वर्गाचे प्रवेश शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी महिनाभराच्या काळातच करावेत, परिपत्रक काढून सर्व शिक्षणाधिकाºयांना तशा सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
प्रवेश अर्जांची किंमत निरनिराळी
नर्सरी प्रवेशावर नजर टाकली असता, प्रवेश अर्जांचे दर सर्वत्र वेगवेगळे असल्याचे दिसून येते. शाळा व्यवस्थापन मनमानीपणे अर्जांची किंमत साधारण २०० ते १ हजार रुपयांच्या आसपास घेत असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात या संदर्भात नियमावलीच नसल्यामुळे अशाप्रकारे शुल्क घेणे म्हणजे पालकांची लूट असल्याची टीका मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी केली.
‘त्या’ शाळेविरोधात कार्यवाहीचे निर्देश
उपसंचालक कार्यालयाशी या संदर्भात संपर्क साधला असता, संबंधित शिक्षण निरीक्षक आणि पालिका शिक्षणाधिकाºयांना शाळेविरोधात कार्यवाही करण्याचे निर्देश उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली असल्याची माहिती मिळाली आहे.