Join us

नर्सरीतून फुललेले आयुष्य

By admin | Published: August 16, 2015 1:43 AM

मध्य रेल्वेने जर कधी सकाळी सहा वाजता कर्जत ते मुंबई असा प्रवास केला तर गाडीच्या मालडब्यात झाडांची रोपे विकायला निघालेल्या बिहारी तरुणांची मोठी दाटी दिसेल. विशेषत: वांगणी

- प्रशांत असलेकर

मध्य रेल्वेने जर कधी सकाळी सहा वाजता कर्जत ते मुंबई असा प्रवास केला तर गाडीच्या मालडब्यात झाडांची रोपे विकायला निघालेल्या बिहारी तरुणांची मोठी दाटी दिसेल. विशेषत: वांगणी स्टेशनवर अनेक बिहारी तरुण बांबूच्या टोपल्यांतून नाना प्रकारची रोपटी, तुळस, शोभेची झाडे, इनडोअर प्लांट्स, प्लास्टिकच्या कुंड्या, माती, खताची पाकिटे, कीटकनाशके अशा गोष्टी भरून भल्या सकाळी मुंबईकडे निघालेले दिसतात. ही मंडळी जागोजागी उतरून रोपे विकतात. स्वस्तात जागा भाड्याने मिळत असल्याने वांगणी हे नर्सरी उद्योगाचे मोठे केंद्र झाले आहे. त्यात काही मराठी मंडळी आहेत; पण त्यांच्या बरोबरीने या व्यवसायात आता बिहारी मंडळींनी मोठी मजल मारली आहे. हा आधुनिक व्यवसाय असून त्यात रोजगाराच्या, चांगल्या भविष्याच्या अनेक संधी आहेत. हेच ओळखून वांगणी येथील संजय पंडित यांनी आपली वाटचाल फुलवली आहे.संजय पंडित हे मूळचे बिहारचे. नेपाळ-भारत सरहद्दीवरील मकसरी या अतिदुर्गम खेड्यातले. त्यांना एकूण ८ भावंडे. संजय त्यातले सगळ््यात मोठे. त्यांना कुणीही शाळेत घातले नाही. त्यांचा दिवस शेतीकामातच जायचा. त्यांचे गाव अतिदुर्गम असले तरी मुंबईला येण्याचे आकर्षण मात्र तिथे होते. त्या आकर्षणापोटीच वयाच्या तेराव्या वर्षी १९९७ साली एका गाववाल्याबरोबर ते मुंबईला आले. तो गाववाला डोंबिवलीच्या नर्सरीत काम करायचा. त्याने त्याच नर्सरीत संजयला कामाला लावले. पगार होता खाऊन-पिऊन ४०० रुपये महिना. वर्षभर तेथे काम करताना नर्सरीत वाढवली जाणारी झाडे, इनडोअर - आऊटडोअर प्लांट्स, कुंडीत माती भरणे, झाडांवर पडणारे रोग, त्यांची घ्यावयची काळजी या सगळ््याचे बारकाईने निरीक्षण केले. तेथील मालक त्यांना रोपाच्या ेटोपल्या विकायला सांगत असे. त्यातून त्यांना विक्री तंत्र समजले. विकत घेणारे त्यांना अनेक शंका विचारत, बाग दाखवत. त्यातून लोकांना कोणत्या प्रकारच्या रोपांची आणि सेवेची गरज आहे ते त्याना समजले. एका वर्षानंतर आपण हा व्यवसाय स्वतंत्रपणे करू शकतो याची त्यांना जाणीव झाली. एका १४ वर्षांच्या मुलासाठी हे मोठे धाडस होते. सगळ्या गोष्टींचा पूर्ण विचार करून ते धाडस त्यांनी स्वीकारले. एका मित्राच्या सहकार्याने त्यांनी प्रथम राहण्याचा प्रश्न सोडवला. नंतर स्वतंत्रपणे बंगल्यांच्या बगिच्यांची कामे घेणे सुरू केले. सुरुवातीचा काळ थोडा कठीण गेला. पण त्यांचे काम चांगले असल्याने त्यांच्यावर कधी मागे वळून बघण्याची वेळ आली नाही. एक काम चांगले केले की त्यातूनच पुढचे काम मिळत गेले. मग त्यांनी गावावरून मुले आणली आणि ते सुपरवायझर झाले. ते स्वत: कामे घेऊन मुलांना तिकडे पाठवून द्यायचे. हळूहळू त्यांच्या कामाचा पसारा वाढत गेला. वांगणी- बदलापूर-कल्याण परिसरात त्यांचे माठे नाव झाले. प्रख्यात बिल्डर्स आपले कॉम्प्लेक्स सुरू करतानाच त्यातील बगिचे निर्माण करण्याचे आणि पुढे त्याच्या मेंटेनन्सचे काम त्यांना देऊ लागले. आता ते या परिसरातील अनेक मोठ्या बिल्डर्सच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील बगिच्यांचे काम बघतात. या परिसरातील अनेक शाळा, सामाजिक संस्था, कंपन्या यांच्या बगिच्यांचे व डाक्टर्स, राजकीय नेते, उद्योजक यांच्या बंगल्यांचे - फार्म हाऊसचे गार्डनिंग त्यांनी केले आहे. तिथे ते आपली नर्सरी चालवतात. गरजेनुसार व मागणीनुसार त्यांना कधी आंध्र प्रदेशातूनही झाडे आणून पुरवावी लागतात. याच धंद्याच्या जीवावर त्यांनी एक ४०७ प्रकारचा टेंपो व राहण्यासाठी फ्लॅटही विकत घेतला आहे. व्यवसायासाठी लागणारी सगळी उपकरणे विकत घेतली आहेत. गेल्या १८ वर्षांत बिहारमधून आलेल्या एका ३१ वर्षांच्या अशिक्षित तरुणाने आपली मेहनत, प्रामाणिकपणा आणि चिकाटी यांच्या जीवावर ही मजल मारली आहे.