मुंबई :
पालिकेच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई, आयसीएसई व आयबी आणि आयजीसीएसई या मंडळाच्या शाळांमधील नर्सरीच्या प्रवेशासाठी लॉटरी प्रक्रिया पार पडली असून या शाळांतील नियमित वर्गही सुरू झाले आहेत. यंदाही शाळांच्या प्रवेशासाठी एक हजार २० जागा उपलब्ध असताना जवळपास ४ हजार १४८ वैध अर्ज आले होते. एका जागेसाठी आलेल्या चार अर्जांमुळे पालिका शिक्षण विभागाने लॉटरी प्रक्रिया घेत ही प्रवेश प्रक्रिया पार पाडल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली. दरम्यान, यामधील कोट्यातील जागांवरही अर्ज आले असून लवकरच ते प्रवेश निश्चित होऊन त्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू होणार असल्याची माहिती तडवी यांनी दिली.
पालिकेच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई), आयसीएसई व आयबी आणि केंब्रिज आयजीसीएसई या मंडळाच्या शाळांमधील नर्सरीसाठीची प्रवेश प्रक्रिया ४ जानेवारीपासून सुरू झाली होती आणि यंदा केवळ पूर्व प्राथमिकच्या जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. गेल्या शैक्षणिक वर्षापासून (२०२१-२२) पालिकेच्या शिक्षण विभागाने पालिकेच्या या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून यंदा ११ सीबीएसई, १ आयसीएसई, १ आयबी आणि १ आयजीसीएसई अशा १४ शाळांमध्ये एकूण १ हजार २० रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे ओढा वाढत चालला असून आर्थिकदृष्ट्या परवडत नसतानाही अनेक पालक सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका शिक्षण विभागाकडून केंद्रीय मंडळाच्या शाळा सुरू करण्यात आल्या असून यातील प्रवेशाला पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या १४ शाळांमधील नर्सरीच्या वर्गासाठी गेल्यावर्षी पालकांचा प्रतिसाद वाढल्यामुळे या शाळांमध्ये नर्सरी व ज्युनिअर केजीची प्रत्येकी एक तुकडी वाढविण्यात आली. मात्र, तरीही चौपट अर्ज आल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे पालकांकडून शाळांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी होत आहे.